Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
By निशांत वानखेडे | Updated: September 15, 2025 20:05 IST2025-09-15T20:05:02+5:302025-09-15T20:05:47+5:30
Nagpur : नरखेड तालुक्यातील भारसिंगी गावाजवळून वाहणाऱ्या जाम नदीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नारसिंगी येथील रहिवासी तरुण प्रवीण कवडेती नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली.

Vidarbha Rain : 24 hours of danger! Rain wreaks havoc in Nagpur; Residential areas flooded, school students pulled out with ropes
Nagpur Rain : साेमवारी दुपारी नागपूरकरांनी पावसाचे भीतीदायक रूप अनुभवले. ढगांची गर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार वादळी पावसाने चांगलीच धडकी भरवली. या पावसाची तीव्रता भयंकर असल्याने ढगफुटी झाली की काय, अशी शंका नागपूरकरांच्या मनात आली. दुपारी तास-दीड तास धाे-धाे पावसाचे थैमान सुरू हाेते.
हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून विजांच्या कडकडाटास मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार येलाे अलर्टही दिला आहे. रविवारी मात्र दिवसभर व रात्रीही ढगांनी शांतता बाळगली. साेमवारी आकाश ढगांनी व्यापले हाेते, पण उकाड्याचा त्रास जाणवत हाेता. दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान आकाश पुन्हा काळ्या ढगांनी व्यापले. ढगांचा गडगडाटही सुरू झाला पण बराच वेळ ढगांनी शांतता बाळगली. मात्र एक-दीड तास शांतता ठेवून असलेले ढग दुपारी २ वाजताच्या दरम्यान अतिशय तीव्रतेने बरसले.
विजांच्या प्रचंड गर्जनासह सुरू असलेल्या वादळी पावसाची तीव्रता भयंकर हाेती. ही जाेर‘धार’ गर्जनासह तास-दीड तास सारख्या तीव्रतेने बरसत राहिली व नंतर शांत झाली. त्यानंतर रिमझिम सरींसह पावसाळी वातावरण सायंकाळपर्यंत कायम हाेते. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत शहरात २७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. आर्द्रता ९५ टक्के हाेती. ज्यामुळे तापमान १.३ अंशाने खाली घसरून ३१.२ अंशावर आले.
येत्या २४ तासात मुसळधारचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रात्री आणि मंगळवारीही अशाच तीव्रतेने पाऊस बरसण्याची शक्यता आहे. विभागाने नागपूरसाठी येलाे अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
अनेक भागात साचले पाणी, झाडे पडली
मुसळधार पावसामुळे वर्धा राेड, तसेच विमानतळाच्या रनवे-वरही पाणी साचल्याची माहिती आहे. नरेंद्रनगर, नरेंद्रनगरचा पुल, त्रिमूर्तीनगर, गाेपालनगर, गाेपालनगर बसस्टॅन्ड, धंताेली, काेराडी राेड परिसरात रस्त्यावर, वस्त्यांमध्ये पाणी शिरले हाेते. स्नेहनगरच्या बाजार परिसर, कराेडपती गल्ली, सिव्हील लाईन्स, प्रियदर्शनीनगर, एनआयटी गार्डनजवळ, अलंकार चाैक, शासकीय आयटीआयजवळचे झाड पडल्याने वाहतूक खाेळंबली हाेती. शहरालगतच्या सखल वस्त्यांमध्येही पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
माॅडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांना रस्सीने काढले
मुसळधार पावसामुळे काेराडी राेडवरील अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. या भागातील माॅडर्न स्कूलच्या पटांगणात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली हाेती. त्यामुळे सुट्टी झाल्यावर विद्यार्थ्यांचे बाहेर निघणे कठीण झाले हाेते. मुलांना नेण्यासाठी आलेल्या पालकांनी वस्तीतील नागरिकांच्या मदतीने दाेर टाकून मुलांना बाहेर काढण्यात आले.
तरुण वाहून गेला; शोधकार्य सुरू
नरखेड तालुक्यातील भारसिंगी गावाजवळून वाहणाऱ्या जाम नदीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नारसिंगी येथील रहिवासी तरुण प्रवीण कवडेती (२७) नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. माहिती मिळताच जलालखेडा पाेलिसांचे पथक घटनास्थळी पाेहचले व शाेधमाेहीम सुरू केली. नदीचा प्रवाह वाढल्याने शाेधकार्यात अडथळे येत हाेते. अंधारामुळे शोध कार्य थांबविण्यात आले असून मंगळवार सकाळी ते पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती ठाणेदार तुषार चव्हाण यांनी दिली.