विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
By निशांत वानखेडे | Updated: October 30, 2025 20:36 IST2025-10-30T20:35:36+5:302025-10-30T20:36:37+5:30
Nagpur : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या माेंथा चक्रीवादळाची सक्रियता आता दक्षिण भारतात तामिळनाडूच्या किणारपट्टीकडे वळली आहे. या प्रभावाने विदर्भात आर्द्रता वाढल्याने पाच-सहा दिवस अवकाळीचा पाऊस सक्रिय हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने तीन दिवसापूर्वी वर्तवला हाेता.

Vidarbha hit by cyclone 'Montha'! Unseasonal weather for the next three days; Will it remain strong till November?
नागपूर : दक्षिण भारतात घाेंगावणाऱ्या ‘माेंथा’ चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळीचे संकट ओढवले आहे. या माेंथाचा विदर्भालाही जाेरदार तडाखा बसला. बुधवारी रात्री विदर्भात सर्वत्र अवकाळीच्या धाे-धाे सरी बरसल्या. गडचिराेली, चंद्रपूर, अमरावतीत तीव्रता अधिक हाेती. गुरुवारी दिवसा जाेर मंदावला असला तरी दिवसभर पावसाळी रिपरिप सुरू हाेती. या अवकाळीने शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची स्थिती आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या माेंथा चक्रीवादळाची सक्रियता आता दक्षिण भारतात तामिळनाडूच्या किणारपट्टीकडे वळली आहे. या प्रभावाने विदर्भात आर्द्रता वाढल्याने पाच-सहा दिवस अवकाळीचा पाऊस सक्रिय हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने तीन दिवसापूर्वी वर्तवला हाेता. पहिल्या व दुसऱ्या दिवशी आकाशात जमलेल्या ढगांनी शांतता बाळगली. मात्र बुधवारी रात्री जाेरदार सरी बरसल्या. गडचिराेलीमध्ये ७२.२ मि.मी. पाऊस बरसला. चंद्रपूरला ६६ मि.मी. तर अमरावतीत ५९.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. याशिवाय वर्धा ३१, भंडारा २७, यवतमाळ २०, बुलढाणा १४, अकाेला १३.३, तर नागपूरला १०.८ मि.मी. पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात मानाेरा भागात सर्वाधिक ८२.९ मि.मी. पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात कामठी तालुक्यात २३.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे.
गुरुवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली हाेती. त्यानंतर थांबून थांबून दिवसभर रिमझिम हाेत राहिली. पावसाचे सत्र रात्रीही कायम हाते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळीचे हे सावट पुढे तीन दिवस म्हणजे २ नाेव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे.
धानाची माती
या अवकाळीच्या तडाख्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना माेठा तडाखा बसला आहे. विशेषत: भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात धानाची शेती माेठ्या प्रमाणात आहे. या काळात धानाचे लाेंब पूर्ण भरलेले असताे व दिवाळीनंतर धानाची कापणी, मळणीची लगबग चालली असते. पावसामुळे धानाचे जमिनीवर आडवे झाले आहेत. माती मिसळल्याने धानाच्या लाेंब्या पुन्हा अंकुरायला लागल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेला धान बांधण्याआधी पावसाचा फटका बसल्याने त्यांचेही माेठे नुकसान झाले आहे. पाण्यात मिसळल्याने धान पाखड हाेण्याची शक्यता आहे. पावसामुळे गाेंदिया जिल्ह्यात ५० हजार हेक्टरमधील धानाचे नुकसान झाले आहे.
गडचिराेली जिल्ह्यात सातत्याने तीन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे कापलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धान अंकुरले. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाचा कहर सुरू असून पिके आडवी झाली. कापून बांधात ठेवलेला धान पाण्याने भिजला. ऐन कापणीच्या टप्प्यात हे संकट कोसळल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. याचबरोबर रब्बी हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशाप्रकारे लाखाे हेक्टरमधील धानाची माती हाेण्याची भीती असून ताेंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कापूस, संत्र्यालाही फटका, भाजीपाल्याची नासधुस
हीच अवस्था कपाशीच्या पट्ट्यात आहे. हजाराे हेक्टरमधील कापूस खराब हाेण्याची भीती आहे. काही भागात कापूस काळवंडला आहे. पावसामुळे त्याची गुणवत्ता घसरण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांवरील संकट अधिक गडद हाेण्याची शक्यता आहे. संत्रा, माेसंबी उत्पादकांनाही अवकाळीने संकटात टाकले असून आंबिया बहाराची प्रचंड नासधुस झाली आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकालाही अवकाळी पावसाचा फटका बसत आहे.