नागपुरात विदर्भवादी आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 15:26 IST2023-08-09T14:56:21+5:302023-08-09T15:26:18+5:30
परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त : आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नागपुरात विदर्भवादी आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी विदर्भवाद्यांच्या मोर्चा धडकलाय. अन्न धान्यावरील जीएसटी, विज दरवाढीसाह इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. या
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निवासस्थानाच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून पोलिसांना काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आज विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी मोर्चा काढत धडक दिली. पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या घराबाहेर बॅरिगेट्स लावून मोठा बंदोबस्त तैनात केला. संविधान चौकापासून आंदोलनकर्त्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात झाली. मोर्चा शांततेनं निघाला होता. दरम्यान, आंदोलनकर्ते फडणवीसांच्या घराकडे कूच करत असताना पोलिसांनी त्यांना मध्येच अडवल्याने वातावरण तापले. संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
वेगळं विदर्भ राज्य ही विदर्भवाद्यांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच विज दरवाढीसाह इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारलं. विदर्भातील जनतेला वीज दरात सूट देण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. तर दुसरीकडे, औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भवाद्यांचा विरोध आहे.