विहिंपची मागणी, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी
By योगेश पांडे | Updated: May 6, 2025 19:04 IST2025-05-06T19:03:24+5:302025-05-06T19:04:54+5:30
श्रीरामांना काल्पनिक पात्र म्हणल्यावरून टीका : कॉंग्रेसकडून जाणुनबुजून हिंदूंचा वारंवार अपमान

VHP demands that Rahul Gandhi apologize to the country
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांनी श्रीराम हे काल्पनिक पात्र असल्याचे वक्तव्य अमेरिकेत केले होते. त्यावरून विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी यावरून राहुल यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी देशाची व हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. मंगळवारी ते नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
अमेरिकेत राहुल गांधी यांनी नुकतीच मुलाखत दिली व त्यात त्यांनी भारतीय इतिहासातील अनेक गोष्टींना काल्पनिक सांगितले. त्यांनी श्रीराम यांनाही एक काल्पनिक पात्र म्हटले आहे. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन हिंदू आस्थेचा अपमान केला आहे. रामसेतूचे प्रकरण न्यायालयात असतानादेखील काँग्रेसने तशीच भूमिका घेत श्रीराम यांना काल्पनिक पात्र म्हटले होते. काँग्रेस वारंवार जाणूनबुजून असे करत असून करत आहे नियोजनबद्ध षडयंत्राअंतर्गत हिंदू धर्मियांचा अपमान करण्यात येत आहे, असा आरोप परांडे यांनी लावला.
यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला व देशाच्या सीमेवरील स्थितीवरदेखील भाष्य केले. पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून निर्दोषांची हत्या करण्यात आली.. त्यामागे ही जिहादी मानसिकता कारणीभूत दिसून येत आहे. या जिहादी हिंसेला ठेचण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी मॉक ड्रीलचे आवाहन केले आहे. पूर्ण हिंदू समाजाने ही बाब गांभीर्याने घेऊन त्याचे पालन करावे. पाकिस्तानचे अनेक छुपे एजंट आपल्या देशात आहे.. ते आमच्यात राहून काम करत असल्याने हिंदू समाजाने सावध राहण्याची गरज आहे, असे परांडे म्हणाले.
हिंदू मंदिरांवर हिंदूंचेच नियंत्रण हवे
विश्व हिंदू परिषदेने हिंदू मंदिरांवर हिंदू नियंत्रणाची मागणी गेले अनेक महिने लावून धरली आहे.. त्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना विहिंपचे पदाधिकारी भेटणार आहे. समाजातदेखील त्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत, अशी माहिती मिलिंद परांडे यांनी दिली.
महाराष्ट्रात गौहत्या विरोधी कायदा हवा
गौरक्षण हा संवेदनशील आणि तेवढाच क्लिष्ट विषय आहे. शेतीची संपूर्ण प्रक्रिया रासायनिक खतांवर आधारित झाल्यामुळे सध्या गौरक्षण करणे कठीण होऊन बसले आहे. त्यासाठी शेतीची संपूर्ण प्रक्रिया गौआधारित करावी लागेल. मात्र तोवर खाटकाकडे जाणाऱ्या गाईंना वाचवण्याचे प्रयत्नही करावे लागतील. महाराष्ट्रात गौ हत्येच्या वाढत्या प्रकरणासंदर्भात आम्ही जनजागरण करू आणि योग्य कायदा तयार करण्यासाठी सरकारवर दबाव आणू, असे परांडे यांनी स्पष्ट केले.