अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने सुरू होती वाहनचोरी, १२ दुचाकी जप्त
By योगेश पांडे | Updated: June 6, 2023 17:48 IST2023-06-06T17:47:57+5:302023-06-06T17:48:45+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई

अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने सुरू होती वाहनचोरी, १२ दुचाकी जप्त
नागपूर : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून १२ दुचाकी चोरणाऱ्या सराईत वाहनचोरांना अटक करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन मुलांसह दोन आरोपी हे गुन्हे करत होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जयाळा येथील राजकुमार जोशी यांची दुचाकी १० एप्रिल रोजी चोरी गेली होती. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांनी मोहीत चौधरी (२२, अमरनगर, हिंगणा रोड) याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. मोहीत हा मुळचा मध्यप्रदेशमधील बालाघाट येथील आहे. त्याच्या चौकशीदरम्यान सरोज रंजन उर्फ बंटी संतोष राम (१९, अमरनगर) व दोन अल्पवयीन मुलांचादेखील चोरीत समावेश असल्याची बाब समोर आली.
आरोपींनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच, धंतोलीतून दोन, बेलतरोडी-सिताबर्डी-हुडकेश्वर-सदर-गिट्टीखदान या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. प्रशांत साबळे, दीपक ठाकूर, विजय सावरकर, गजानन राठोड, इस्माईल नौरंगाबादे, विक्रांत देशमुख, नीरज पाठक, धर्मेंद्र यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.