नागपुरात भाजीपाला व फळांचा तुटवडा : कळमना फळ बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 21:12 IST2020-03-24T21:10:53+5:302020-03-24T21:12:28+5:30
कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नसल्याने अडतिया असोसिएशनने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपुरात भाजीपाला व फळांचा तुटवडा : कळमना फळ बाजार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नसल्याने अडतिया असोसिएशनने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फळ बाजार बुधवार आणि भाजीपाला बाजार शुक्रवारपासून ३१ मार्चपर्यंत ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात फळे आणि भाज्यांचा तुटवडा होणार असून गृहिणींना घरगुती भाज्यांवर भर द्यावा लागणार आहे. विहिरगाव येथील शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, भाज्या तोडणीला आल्यानंतर शेतात ठेवता येत नाही. त्याची विक्री करावीच लागते. अशा स्थितीत सोमवारपर्यंत रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री केली. पण मंगळवारी पोलिसांनी हाकलून लावले. विक्री करणार कुठे हा प्रश्न आहे. त्यामुळे भाज्या घरीच पडून आहेत. कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे.
कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, देशाच्या अन्य राज्यातून रविवारपर्यंत फळांची आवक होती. पण शहरात कर्फ्यू असल्याने फळांची विक्री झाली नाही. त्यामुळे बहुतांश फळे विक्रीविना पडून आहेत. फळे नाशवंत असल्याने साठवणूक करता येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना कळमन्यात फळे आणण्यास मनाई केली आहे. मंगळवारी असलेली फळे विकून बुधवारपासून दुकाने बंद ठेवणार आहे, असा निर्णय अडतिया असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे शहरात ३१ मार्चपर्यंत फळे मिळणार नाहीत.
कळमन्यातील युवा सब्जी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. पण शहरात कर्फ्यू असल्याने किरकोळ विक्रेते कळमन्यात भाज्या खरेदीसाठी येत नाहीत; शिवाय शहरातील आठवडी बाजारही बंद झाले आहेत. त्यामुळे दररोज भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात शिल्लक असतात. अन्य राज्यातून येणाऱ्या ट्रकची वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे कळमन्यात भाज्या विक्रीसाठी आणू नये, असे स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले आहे. शुक्रवारी बाजाराला सुटी असते. त्यामुळे शनिवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. भाज्या मिळत नसल्याने लोकांमध्ये रोष असल्याचे सांगितले.