स्टिरॉइड्सचा वापर 'फेअरनेस क्रीम' म्हणून ? अयोग्य उपचारांवर कठोर कारवाईची मागणी
By सुमेध वाघमार | Updated: October 3, 2025 18:43 IST2025-10-03T18:40:54+5:302025-10-03T18:43:02+5:30
Nagpur : अयोग्य उपचाराला लगाम घालण्यासाठी ‘आयएडीव्हीएल’ची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी

Use of steroids as 'fairness cream'? Demand for strict action against improper treatment
नागपूर : सामान्य नागरिकांच्या त्वचेच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या अयोग्य वैद्यकीय उपचारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ‘इंडियन असोसिएशन आॅफ डर्मेटोलॉजिस्ट, व्हेनेरिओलॉजिस्ट अँड लेप्रोलॉजिस्ट (आयएडीव्हीएल) या त्वचा रोग तज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेने केली आहे. ‘आयएडीव्हीएल’च्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, त्वचारोगावर होणारे चुकीचे उपचार आणि स्थानिक स्टिरॉइड्सच्या वाढत्या गैरवापराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली
‘आयएडीव्हीएल’चे अध्यक्ष डॉ. राजीव शर्मा यांच्या मार्गदर्शनातील शिष्टमंडळाने यावेळी सामुदायिक उपक्रमांचा तपशीलवार आढावा सादर केला. भेटीदरम्यान, देशातील त्वचेचे आरोग्य अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक पाठिंब्याची मागणी केली. यात गैर-प्रशिक्षित व्यक्तींद्वारे होणारे चुकीचे त्वचा उपचार आणि त्याचे त्वचेच्या आरोग्यावर होणारे दीर्घकालीन वाईट परिणाम याची माहिती देण्यात आली. या बेकायदेशीर पद्धतींवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली.
स्टिरॉइड्सचा गैरवापर वाढला
त्वचारोगावर स्टिरॉइड्सचा गैरवापर कसा वाढला, यामुळे ‘फंगल इन्फेक्शन’ चा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे शिष्टमंडळाने गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. स्टिरॉइड्स ही डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आहेत आणि त्यांचा गैरवापर सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा 'फेअरनेस क्रीम' म्हणून करू नये, याबद्दल समाजात सामाजिक जागरूकता निर्माण करण्याची गरज यावर जोर दिला गेला.
मुद्दे आरोग्य मंत्रालयात मांडणार
‘आयएडीव्हीएल’च्या शिष्टमंडळाच्या गंभीर समस्या ऐकून घेतल्यानंतर गडकरी यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले की, हे सर्व मुद्दे आरोग्य मंत्रालयात मांडले जातील आणि त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिष्टमंडळात मानद सरचिटणीस डॉ. भूमेश कुमार कटकम, उपाध्यक्ष (महाराष्टÑ) डॉ. रिझवान हक, ‘व्हीडीएस’चे माजी अध्यक्ष डॉ. धनराज पटेल, माजी सचिव डॉ. श्रद्धा महल्ले, डॉ. विक्रांत सावजी, डॉ. सुशील पांडे व गोपाल दवे उपस्थित होते.