अवकाळी पावसाने उतरविला नवतपाचा ज्वर, नागपूरचा पारा घसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 19:36 IST2023-05-28T19:35:18+5:302023-05-28T19:36:00+5:30
पारा घसरला : पुढचे दाेन दिवस वीजगर्जन व वादळाचा अंदाज

अवकाळी पावसाने उतरविला नवतपाचा ज्वर, नागपूरचा पारा घसरला
नागपूर : यंदाचा संपूर्ण एप्रिल महिना अवकाळी पावसाने धुवून काढला. आता नवतपा तापदायक ठरेल हा अंदाजही फाेल ठरल्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारनंतर रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने नवतपाचा तापही उतरवून साेडला. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान २४ तासात १.१ अंशाने घसरून ४०.८ अंशावर पाेहचला. त्यामुळे उन्हाचे चटके कमजाेर पडले आहेत.
शनिवारी सायंकाळी पावसाच्या हजेरीनंतर रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असूनही उन तापले हाेते. दुपारी २ वाजतानंतर मात्र आकाशात ढगांचा रंग बदलला हाेता. जाेराच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा देत वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतरही उन सावल्यांचा खेळ चालला. रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह विजांचा जाेर दिसून येत हाेता.
एप्रिलनंतर मे महिन्याचा पहिला आठवडा अवकाळी पावसात गेला. त्यानंतर उन्हाचे चटके वाढले पण गेल्या वर्षीप्रमाणे यंदा सूर्य अपेक्षेप्रमाणे तापला नाही. केवळ एक दिवस तापमान ४४ अंशावर गेले व त्यानंतर ४१ ते ४२ अंशावर पारा स्थिरावला आहे. दमट वातावरणामुळे लाेकांची चिडचिड मात्र वाढल्याचे दिसून आले. आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून पुढचे दाेन दिवस वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नवतपाही तापण्यापेक्षा गारवा वाटण्याची शक्यता आहे.
दरम्यान नागपूरसह विदर्भातील इतर शहरांचा पाराही घसरला आहे. चंद्रपुरात तापमान सरासरीपेक्षा १ अंशाने घसरत ४२.४ अंशावर आहे. गडचिराेलीमध्ये सर्वाधिक ४३.४ अंश तापमानाची नाेंद झाली आहे. अमरावती ४१.६ अंश व अकाेल्यात ४२.२ अंशासह पारा सरासरीत आहे. गाेंदियामध्ये पारा घसरून ४१.२ अंशावर गेला आहे. पुढचे दाेन दिवस तापमानात घसरण हाेण्याची शक्यता आहे.