विद्यापीठाची चाैकशी समिती डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात धडकली; दिसून आले गैरप्रकार
By निशांत वानखेडे | Updated: February 11, 2026 19:38 IST2026-02-11T19:36:48+5:302026-02-11T19:38:03+5:30
Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी हाेणाऱ्या गैरप्रकाराची चाैकशी करण्यासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या चाैकशी समितीने बुधवारी महाविद्यालयाला भेट दिली.

University's inspection committee raids Dr. Ambedkar College; irregularities found
नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी हाेणाऱ्या गैरप्रकाराची चाैकशी करण्यासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या चाैकशी समितीने बुधवारी महाविद्यालयाला भेट दिली. मात्र काॅलेज प्रशासनाकडून समिती सदस्यांना असहकार्याचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. या स्थितीतही समितीने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तक्रारीची सतत्या जाणून घेतली आणि नव्या तक्रारीही स्वीकारल्या.
ऑगस्ट महिन्यात महाविद्यालयातील २६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्मारक समितीचे सुधीर फुलझेले यांना महाविद्यालयाचे रवी मेंढे व इतरांविराेधात तक्रार केली हाेती. महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन हाेणे, कर्मचाऱ्यांची पदाेन्नती राेखून धरणे, नाहक त्रास देणे अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या हाेत्या. मात्र तक्रारीवर काहीही हालचाली झाल्या नाहीत. त्यानंतर एका प्राध्यापिकेने मेंढेविराेधात विनयभंगाची तक्रार केली. या तक्रारी विद्यापीठाकडेही करण्यात आल्या.
दरम्यान डाॅ. मनाली क्षीरसागर यांनी कुलगुरू पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर झालेल्या सिनेट सभेत सदस्यांनी डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात सुरू असलेल्या गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर कुलगुरुंनी सिनेट सदस्य डाॅ. नितीन काेंगरे यांच्या अध्यक्षतेत चाैकशी समिती स्थापन केली. यामध्ये विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या डाॅ. शालिनी लिहितकर यांच्यासह चाैघांचा समावेश आहे. या समितीने बुधवारी महाविद्यालयात धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार समिती सदस्यांनी प्राचार्य डाॅ. दीपा पान्हेकर यांची सुरुवातीला भेट घेतली असता प्राचार्यांनी काही बाेलण्यास नकार दिला. उलट न्यायालयात प्रकरण सुरू असताना तुम्ही कशी काय चाैकशी करता, असा सवाल समितीला केला. समिती सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही प्राचार्यांचा विराेध चालला हाेता, अशी सुत्रांची माहिती आहे. या स्थितीतही समिती सदस्यांनी काही कर्मचाऱ्यांशी चर्चा करीत तक्रारींची सतत्या जाणून घेतली.
अर्ध्या कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी
दरम्यान चाैकशी समिती येणार असल्याची माहिती प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिली नाही किंवा त्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या कर्मचाऱ्यांना परस्पर सुट्टी देण्यात आल्याचीही माहिती सुत्राने दिली आहे. समितीसमाेर कुणी बाेलू नये म्हणून कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. जे कर्मचारी हजर हाेते, त्यांच्यावरही पहारा ठेवण्यात आला.
कुलगुरुंना सादर करणार अहवाल
समितीने परिस्थितीनुसार हजर असलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या नव्या तक्रारीही स्वीकारल्या. ही पहिली भेट हाेती, आणखी भेट द्याव्या लागतील, असे समितीतील एका सदस्याने सांगितले. हा अहवाल कुलगुरुंना देण्यात येईल. प्राचार्य व इतरांचीही साक्ष नाेंदवावी लागेल, असेही या सदस्यांनी सांगितले.
स्मारक समिती अध्यक्षांचे संघटनांशी गैरवर्तन
दरम्यान चाैकशी समिती येणार असल्याची माहिती मिळाल्याने काही सामाजिक संघटना भेटीसाठी आल्या हाेत्या. सुरुवातीला प्राचार्याशी चर्चा केली. त्यानंतर डाॅ. आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांच्याशी चर्चेसाठी गेले असता भंते ससाई यांची वागणूक अतिशय उर्मट हाेती व त्यांनी संघटनेतील महिलांशी गैरवर्तन केल्याचा आराेप संघटनांनी केला आहे. त्यांनी स्मारक समितीच्या दाेन सदस्यांनाही मारहान केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संतापलेल्या संघटनांनी ‘प्राचार्य हटवा, स्मारक समिती बरखास्त करा, दाेषींवर कारवाई करा’, अशा घाेषणा महाविद्यालयासमाेर दिल्या.