गोदरेज आनंदन टाऊनशिपमध्ये अस्वच्छता : हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 22:40 IST2020-09-24T22:38:37+5:302020-09-24T22:40:10+5:30
गणेशपेठ येथील गोदरेज आनंदन टाऊनशिपमधील अस्वच्छतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गोदरेज आनंदन टाऊनशिपमध्ये अस्वच्छता : हायकोर्टात याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ येथील गोदरेज आनंदन टाऊनशिपमधील अस्वच्छतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांमध्ये सुनील चिरानिया व इतर पाच रहिवाशांचा समावेश आहे. सहा टॉवरच्या या गृह प्रकल्पामध्ये सध्या ३०० वर कुटुंबे राहत आहेत. योजनेतील अविकसित भागामध्ये रोजचे सांडपाणी व पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डास व अन्य विषारी कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यांच्यापासून योजनेतील रहिवाशांना मलेरिया, डेंग्यू, मेंदूज्वर, कावीळ, चिकनगुनिया असे विविध गंभीर आजार होत आहेत. हे आजार लहान मुलांसाठी घातक ठरत आहेत. तसेच, परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत व कचरा पसरला आहे. परिसराची देखभाल करण्याची व सर्वत्र स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी गोल्डब्रिक्स कंपनीची आहे. रहिवाशांनी या समस्यांसंदर्भात कंपनीला वारंवार कळवले. परंतु, कंपनीने त्याकडे लक्ष दिले नाही. याविषयी १९ ऑगस्ट रोजी मनपाकडेही तक्रार करण्यात आली. मनपानेदेखील काहीच कारवाई केली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. योजनेतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या गोल्डब्रिक्स कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.