सी-२० च्या तयारीसाठी महापालिकेनेच वीज चोरली, महावितरणची कारवाई; ५० हजाराचा दंड वसुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 13:38 IST2023-03-19T13:38:01+5:302023-03-19T13:38:28+5:30
जी २० परिषेदेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी महानगर पालिकेने १३ ठिकाणी अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे.

सी-२० च्या तयारीसाठी महापालिकेनेच वीज चोरली, महावितरणची कारवाई; ५० हजाराचा दंड वसुल
- आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात जी २० अंतर्गत होऊ घातलेल्या सी-२० परिषदेसाठी संपूर्ण शहरात रोषणाई करण्यात आली आहे. हे करीत असताना खासगी कंत्राटदाराकडून अनधिकृतरित्या वीज वापर केल्याचे निर्दशनास आले आहे. महावितरणने याची दखल घेत अधिकृत वीज जोडणी घेण्याचे पत्र महानगरपालिकेला दिले आहे. तसेच ज्या ठिकाणी अनधिकृत वीज वापर होत असल्याचे महावितरणला आढळून आले अशा ७ ठिकाणी महावितरणने कारवाई करून सुमारे ५० हजार रुपयांचं दंड वसूल केला आहे.
जी २० परिषेदेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी महानगर पालिकेने १३ ठिकाणी अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. त्यात काँग्रेस नगर विभागात ८ तर सिव्हिल लाईन भागात ४ अशा १२ ठिकाणी वीज जोडणीचा समावेश आहे. याशिवाय आणखी ९ ठिकाणी नवीन वीज जोडणी साठी अर्ज आले आहेत. मात्र काही ठिकाणी रोषणाई साठी खासगी कंत्राटदाराकडून अनधिकृतरित्या वीज वापर होत असल्याचे महावितरणला आढळून आले. त्याठिकाणी महावितरण ने तात्काळ तेथील वायर जप्त केले व संबंधितांवर कारवाई केली आहे.
दिनांक १५ मार्च ला सोमलवाडा चौकात व सिव्हिल लाईन विभागात महावितरणने कंत्रातदारविरुद्ध वीज कायदा कलम १३५ अन्वये कारवाई करून एकूण १८,६३० रुपये वसूल केले आहे.तसेच शहरात अन्यत्र ६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून या कंत्राटदाराकडून ३० हजार १३०रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महावितरणने अधिकृतरित्या वीज जोडण्या घेण्याबाबत महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांना अधिकृत वीज जोडण्या घेण्या बाबत विनंती केली आहे.