सिलिंडर मिळेना, हॉटेलमध्ये पेटल्या चुली ! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठाच ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:30 IST2026-03-11T15:29:19+5:302026-03-11T15:30:39+5:30
Nagpur : मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीत आलेल्या अडथळ्यांचा मोठा फटका आता नागपूरच्या खाद्य जगताला बसू लागला आहे. शहरात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल उद्योगाचा श्वास कोंडला आहे.

Unable to get cylinders, stoves caught fire in hotels! Supply of commercial cylinders has come to a standstill
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीत आलेल्या अडथळ्यांचा मोठा फटका आता नागपूरच्या खाद्य जगताला बसू लागला आहे. शहरात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल उद्योगाचा श्वास कोंडला आहे. गेल्या चार दिवसांपासून सिलिंडरचा 'दुष्काळ' पडल्याने गॅसच्या निळ्या ज्योतीवर शिजणारी नागपूरची चव आता चक्क लाकडाच्या धुरावर तग धरून आहे. ही परिस्थिती केवळ गॅसच्या टंचाईची नसून, हजारो हातांच्या रोजगारावर आलेली संक्रांत आहे.
कामगारांचे आरोग्य धोक्यात
नागपूरच्या गजबजलेल्या सीए रोड, बर्डी आणि आयटी पार्क परिसरातील हॉटेलमध्ये आता विचित्र चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलिंडर नसल्याने अनेक हॉटेलमालकांनी नाईलाजास्तव जुन्या काळातील चुली' पेटवल्या आहेत. हॉटेलच्या मागच्या बाजूला किंवा छतावर लाकडं आणि कोळसा जाळून अन्न शिजवले जात आहे. यामुळे केवळ पर्यावरणाचेच नुकसान होत नाही, तर धुरामुळे कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. नागपूरच्या हवेत आता मसाल्यांच्या वासाऐवजी लाकडाच्या धुराचा दर्प अधिक जाणवू लागला आहे.
लाकडे जळली तर वाढेल वायुप्रदूषण
शहरातील लहानमोठ्या हॉटेलमध्ये अन्नपदार्थ शिजविण्यास सिलिंडरऐवजी लाकडे जाळण्यात आल्यास प्रदूषणाचेही मोठे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. कार्बन मोनोऑक्साइड श्वसनास हानिकारक आहे. कार्बन डायऑक्साइड हरितगृह वायू असून, हवामान बदलाला कारणीभूत ठरतो. सूक्ष्म धूरकण हवेत पसरतात. हे फुप्फुसात जाऊन दमा, श्वसनाचे आजार वाढवतात. नायट्रोजन ऑक्साइड वायू स्मॉग तयार होण्यास आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करण्यास कारणीभूत ठरतो.
प्रशासकीय यंत्रणा आणि 'एसेन्शियल कमोडिटी अॅक्ट'
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्र सरकारने 'अत्यावश्यक वस्तू कायदा' लागू केला आहे. तेल शुद्धीकरण कारखान्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नागपूरच्या स्थानिक बाजारपेठेत हा पुरवठा कधी पूर्ववत होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत साठेबाजी रोखण्याचे मोठे आव्हान अन्न पुरवठा विभागासमोर आहे.
"सरकारच्या आदेशानुसार गॅस एजन्सीने रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला आहे. ज्यांच्याकडे सिलिंडर आहेत, ते तग धरून आहेत. नंतर त्यांनाही रेस्टॉरंट बंद करावे लागेल. अशा कठीण परिस्थितीत आम्ही सरकारसोबत आहोत."
- तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशन.
"नागपुरात २ ते ३ दिवसांचा गॅस सिलिंडरचा साठा असतो. दरदिवशी सिलिंडर रिफिलिंग करावे लागतात. घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत आहे, तर व्यावसायिक सिलिंडर विकण्यावर बंधने आहेत. हॉस्पिटल आणि गरजूंना सिलिंडर देण्यात येत आहेत. गॅस सिलिंडरचा कुणीही साठा करू नये."
- विनोद काळे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी.
"रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सिलिंडरचा पुरवठा करावा, या मागणीसाठी असोसिएशनचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत."
- भवानीशंकर दवे, अध्यक्ष, नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन.