नागपूर विमानतळावर पकडले तस्करीचे पावणेदोन किलो सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 10:57 AM2023-09-20T10:57:56+5:302023-09-20T10:58:33+5:30

कस्टमची कारवाई : कतारवरून आलेल्या कर्नाटकातील तस्करांना अटक

Two kilos of gold worth 87 lakhs smuggled caught at Nagpur airport | नागपूर विमानतळावर पकडले तस्करीचे पावणेदोन किलो सोने

नागपूर विमानतळावर पकडले तस्करीचे पावणेदोन किलो सोने

googlenewsNext

नागपूर :नागपूर विमानतळावर मंगळवारी पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास कतारहून आलेल्या दोन तरुणांना सीमाशुल्क विभागाने पावणेदोन किलो सोन्यासह पकडले. त्याची किंमत ८७ लाख १४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोघांनी हे सोने आपल्या सामानात लपवून पेस्ट स्वरूपात आणले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मो. शाहीद नालबंद (३३) रा. हुबळी, कर्नाटक व पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर (३८) रा. हंगल, कर्नाटक यांचा समावेश आहे.

कतार एअरवेजमधून दोन जण सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाने मंगळवारी मध्यरात्रीनंतर नागपूर विमानतळावर सापळा रचला. कतारहून आलेले कतार एअरवेजचे फ्लाइट क्र. क्यूआर-५९० हे विमान नागपूर विमानतळावर उतरताच कस्टम अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना थांबवून एका खोलीत नेऊन त्यांची झडती घेतली. या दोघांकडे २४ कॅरेटचे १ किलो ६९७ ग्रॅम सोने सापडले आहे. हे सोने पेस्ट स्वरूपात होते आणि सोन्याचे कॅप्सूलमध्ये रूपांतर केले होते. अशा कॅप्सूल प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवणे सोपे आहे. दोघेही कर्नाटकातील असून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे.

चौकशीसाठी बाजूला घेतले अन् घबाड मिळाले

या दोघांची कस्टम विभाग चौकशी करत आहे. दोघांकडून मोबाइल फोन, पासपोर्ट आणि सोने जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत नागपुरात सोन्याची तस्करी वाढली आहे. सोन्याच्या तस्करीची वाढती प्रकरणे पाहता नागपूर हे तस्करांसाठी नवीन मोक्याचे ठिकाण ठरत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या दोन्ही मोबाइलचे सीडीआर काढले जात आहेत. सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान दोघांनी अद्याप सूत्रधाराचे नाव उघड केलेले नाही.

सीमाशुल्क आयुक्त अविनाश थेटे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम्स युनिट अधिकाऱ्यांच्या पथकाने अधीक्षक पाल आणि निरीक्षक प्रबल कुमार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहायक आयुक्त व्ही. सुरेश बाबू व व्ही. लक्ष्मी नारायण यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Two kilos of gold worth 87 lakhs smuggled caught at Nagpur airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.