ट्रकची कारला धडक; भीषण अपघातात दाेघांचा मृत्यू, दाम्पत्य गंभीर जखमी
By सुनील चरपे | Updated: February 27, 2023 17:10 IST2023-02-27T17:08:22+5:302023-02-27T17:10:18+5:30
अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना

ट्रकची कारला धडक; भीषण अपघातात दाेघांचा मृत्यू, दाम्पत्य गंभीर जखमी
काेंढाळी (नागपूर) : वेगात जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जाेरात धडक दिली. त्यात कारचालकासह अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार येथील महामार्ग पाेलिस केंद्राजवळ साेमवारी (दि. २७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
कारचालक आदित्य सुखदेव माने (वय ३२, रा. मॉडेल कॉलनी, द्वीप बंगला चौक, पुणे) व बिसेन पवन मराठे (२२, रा. मानेगाव-बिरसा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) अशी मृतांची, तर संतलाल कमललाल पंचेश्वर (२५) व रितू संतलाल पंचेश्वर (२०, दाेघेही रा. मानेगाव-बिरसा, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.
चाैघेही एमएच-०३/सीव्ही-११६८ क्रमांकाच्या कारने छत्रपती संभाजीनगर येथून अमरावती मार्गे नागपूरच्या दिशेने येत हाेते. दरम्यान, खुर्सापार शिवारात वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून नागपूर-अमरावती मार्गे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४५/एई-६३९९ क्रमांकाच्या ट्रकने कारला जाेरात धडक दिली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाचा चुराडा हाेऊन ती रस्त्यावरच उलटली. यात दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले.
संजय गायकवाड यांनी दाेन्ही जखमींना लगेच काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दाेघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती डाॅ. पुष्पक खवशी यांनी दिली. शिवाय दाेघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
हाेळीनिमित्त गावी परतताना झाला घात
बिसेन, संतलाल व रितू हे छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीत कामगार म्हणून काम करायचे. हाेळीनिमित्त त्या तिघांनाही त्यांच्या मूळ गावी जायचे हाेते. आदित्य एकटाच एमएच-०३/सीव्ही-११६८ क्रमांकाच्या कारने पुण्याहून नागपूरला येत हाेता. त्यातच त्या तिघांना नागपूर मार्गेच बालाघाटकडे जायचे असल्याने आदित्यने त्यांना प्रवासी म्हणून कारमध्ये घेतले हाेते.
रस्ता दुरुस्ती अपघाताच्या पथ्यावर
हा राष्ट्रीय महामार्ग चाैपदरी असून, त्याला दुभाजक आहे. या महामार्गावर बहुतांश वाहने सुसाट वेगाने धावतात. या महामार्गावरील कोंढाळी-तळेगाव (जिल्हा वर्धा) या लेनच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या लेनवरील वाहतूक तळेगाव-कोंढाळी लेनवर वळवली आहे. एकाच लेनवरून दाेन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे या लेनवरील वाहतूक दाेन तास ठप्प हाेती.