भरधाव कारचालकाच्या मस्तीमुळे दोन मुलींचं पितृछत्र हरपलं; नागपुरातील हृदयद्रावक घटना
By योगेश पांडे | Updated: September 19, 2023 18:14 IST2023-09-19T18:13:51+5:302023-09-19T18:14:06+5:30
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एका ठेकेदाराचा मृत्यू झाला.

भरधाव कारचालकाच्या मस्तीमुळे दोन मुलींचं पितृछत्र हरपलं; नागपुरातील हृदयद्रावक घटना
नागपूर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एका ठेकेदाराचा मृत्यू झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सचिन दुर्जनलाल भिमटे (३८, श्रीराम नगर, न्यू सुभेदार ले आऊट) असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी रात्री ते ठेकेदारीच्या कामाने खापरी येथे मोटारसायकलने गेले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घरी परतत असताना शताब्दी चौकात सुयोगनगर कडून येणाऱ्या एमएच ३२ सी ७२७९ या कारने त्यांना जोरदार धडक दिली.
त्यात किशोर रामचंद्र बाभरे (४१, सरस्वतीनगर) हा कारचालक होता. या धडकेत सचिन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी राणू यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी किशोरला अटक केली आहे. सचिन यांना दोन लहान मुली आहे व सचिन यांच्या मिळकतीवरच घर चालत होते. या अपघातामुळे भिमटे कुटुंबाचा आधारच हरवला आहे.