क्षयरोगाचा विळखा घट्ट होतोय; पूर्व विदर्भात आढळले ९२५८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:59 AM2018-09-01T11:59:50+5:302018-09-01T12:00:10+5:30

देशात क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी २९ लाख नवे रुग्ण समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये २०१७ मध्ये दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे.

Tuberculosis is increasing; Found 9 258 patients in east Vidarbha | क्षयरोगाचा विळखा घट्ट होतोय; पूर्व विदर्भात आढळले ९२५८ रुग्ण

क्षयरोगाचा विळखा घट्ट होतोय; पूर्व विदर्भात आढळले ९२५८ रुग्ण

Next
ठळक मुद्देएकट्या मेडिकलमध्ये १८१३ रुग्णांची नोंद

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी २९ लाख नवे रुग्ण समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये २०१७ मध्ये दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे. यात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील ९२५८ रुग्णांचा समावेश आहे. एकट्या मेडिकलमध्ये १८१३ रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक म्हणजे, यातील ३० टक्के रुग्ण हे तरुण आहेत.
उपचारांमध्ये बरीच प्रगती झाली असली तरी क्षयरोग हा प्रथम क्रमांकाचा जीवघेणा रोग आजही कायम आहे. जगात या रोगाने रोज ४५०० रुग्णांचा मृत्यू होतो. यातच हे जंतू विविध औषधांना प्रतिरोध निर्माण होऊन दाद देत नसल्याने एका मोठ्या महाभयानक परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर मात्र आटोक्यात येणारा आजार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांतील पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील आकडेवारी पाहता रुग्णांच्या संख्येत फारसा बदल झालेला नसल्याचे चित्र आहे. २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग हद्दपार करण्याचे आरोग्य विभागाचे लक्ष्य आहे. जास्तीत जास्त रुग्णांना शोधून काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु तूर्तास तरी रुग्णांच्या उपलब्ध संख्येवरून हे लक्ष्य दूर असल्याचे बोलले जात आहे.

सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात
२०१४ ते २०१७ या वर्षांत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांची आकडेवारी पाहता सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये २१७७, २०१५मध्ये २२६०, २०१६मध्ये २१६३ तर २०१७मध्ये २२६५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर नागपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये २३५२, २०१५मध्ये २०८१, २०१६ मध्ये १८४२ तर २०१७मध्ये २०४३ रुग्ण आढळून आले आहेत.

चार वर्षांत रुग्णसंख्या सारखीच
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा या सहा जिल्ह्यातील गेल्या चार वर्षांमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांच्या आकडेवारीत फार जास्त बदल झालेला दिसून येत नाही. सहा जिल्हे मिळून २०१४ मध्ये ९४१६, २०१५मध्ये ९३३५, २०१६मध्ये ८९०० तर २०१७मध्ये ९२५८ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २०१६ मध्ये १५९४ तर २०१७ मध्ये १८१३ रुग्ण आढळून आले आहेत. यात ‘मल्टिड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’च्या रुग्णांची संख्या (एमडीआर-टीबी) ४७ तर गेल्यावर्षी ५६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याहीपुढे जाऊन ‘एक्सटेसिव्ह ड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एक्सडीआर-टीबी) रुग्णांची संख्या दोन्ही वर्षी दोन-दोन होती.

रुग्ण शोधण्याचे प्रमाण वाढले
आरोग्य विभागाकडून रुग्ण शोधण्यांचे प्रमाण वाढले आहे. जास्तीत जास्त रुग्ण औषधोपचाराखाली आणले जात आहे. यामुळे आताजरी रुग्णसंख्या कमी झालेली दिसणार नाही, तरी काही वर्षांत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे, बरे झालेले रुग्ण पुन्हा व्यसनाकडे वळत असल्याने क्षयरोगाच्या औषधांना प्रतिरोध निर्माण होत आहे. क्षयरोगांमध्ये तरुण रुग्णांची संख्या ३० टक्के आहे.
-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, रेस्पिरेटरी मेडिसीन विभाग, मेडिकल

Web Title: Tuberculosis is increasing; Found 9 258 patients in east Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य