नागपुरात पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:14 IST2020-08-31T22:13:02+5:302020-08-31T22:14:15+5:30
वाहनात डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून तीन लुटारूंनी त्याला गंभीर जखमी केले. यानंतर लुटारूंनी त्याच्या जवळचे चार हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला.

नागपुरात पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालकाला लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहनात डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून तीन लुटारूंनी त्याला गंभीर जखमी केले. यानंतर लुटारूंनी त्याच्या जवळचे चार हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ ही थरारक घटना घडली. पंकज राम अवतार कुशवा (वय ३१) असे जखमी चालकाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील करलीजर नरजनी (जि. बांदा) येथील रहिवासी आहे.
शनिवारी रात्री तो माल घेऊन नागपुरात आला होता. माल खाली केल्यानंतर त्याने येथे मुक्काम केला. रविवारी त्याला वाडीतील ट्रान्सपोर्टकडे जायचे होते. त्यामुळे रात्री ११ च्या सुमारास तो जरीपटक्याच्या मार्टिन नगरातील भारत पेट्रोल पंपाजवळ थांबला. तेथे तो वाहनातील डिझेल बघत असताना तीन लुटारू त्याच्याजवळ आले. एका आरोपीने पंकजला १० हजार रुपये मागितले तर दुसऱ्या आरोपीने पाच हजार रुपये मागितले. तिसºया आरोपीने गाडीची कागदपत्रे मागितली. पंकजने त्यांना तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे आहात, असे विचारले असता आरोपीने शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. तो प्रतिकार करत असल्याचे पाहून एका आरोपीने जवळचा चाकू काढून त्याच्यावर हल्ला चढवला. पोटावर, छातीवर मागच्या बाजूला वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर पंकजच्या पाकीटमधील चार हजार रुपये आणि मोबाईल असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून आरोपी पळून गेले. पंकज आणि त्याच्या सहकाऱ्याने मदतीसाठी आरडाओरड केल्याने बाजूची मंडळी धावली. त्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पंकजला सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. जरीपटका पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.