नागपुरात टिप्परच्या धडकेत ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:23 IST2019-04-28T00:22:55+5:302019-04-28T00:23:34+5:30
टिप्परचालकाने मागून जोरदार धडक मारल्यामुळे एक ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमरास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला.

नागपुरात टिप्परच्या धडकेत ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टिप्परचालकाने मागून जोरदार धडक मारल्यामुळे एक ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमरास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. सौरभ कीर्तीदास खोब्रागडे (वय २५)असे मृताचे नाव आहे तर जखमीचे नाव शिशुपाल रामू पिळघाम (वय ३०) आहे. हे दोघेही उमरेड तालुक्यातील अकोला (आपतूर) येथील रहिवासी होत.
सौरभ आणि शिशुपाल हे दोघे त्यांच्या ट्रॅक्टरने (एमएच ४०/ एल ३८७५) पांढुर्ण्याला गेले होते. शनिवारी दुपारी ते आपल्या गावाकडे परत जात होते. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर आऊटर रिंगरोडवर ओरिएन्टल कंपनीजवळ मागून वेगात आलेल्या टिप्परचालकाने ट्रॅक्टरला जोरदार धडक मारली. त्यामुळे ट्रॅक्टरने दोन पलट्या घेतल्या. ट्रॅक्टरचालक सौरभ आणि बाजुला बसलेला शिशुपाल दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलला नेण्यात आले. तेथे सौरभला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिशुपाल रामू पिळघाम याने हुडकेश्वर पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.