राष्ट्रभूमी, मातृभूमी अन् प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:00 AM2019-11-28T11:00:13+5:302019-11-28T11:01:55+5:30

राष्ट्रभूमी, मातृभूमी आणि प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा ‘सिनेमॅटिक’ अंदाजाने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे.

The tragedy of Kashmiris trapped in the nation, the homeland and the land of love | राष्ट्रभूमी, मातृभूमी अन् प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा

राष्ट्रभूमी, मातृभूमी अन् प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘लाईव्ह’ प्रसंगांनी नाटकात आणली बहार५९ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

प्रवीण खापरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काश्मीर आणि काश्मीरमधील घडामोडींबाबत अनभिज्ञ आहेत, असे साधारणत: अभावानेच सापडतील. भलेही तेथील वास्तविकतेचे मर्म कुणालाही कळणार नाही. आॅगस्ट २०१९ मध्ये भारत सरकारने रद्द केलेल्या ‘कलम ३७०’मुळे तर अनेकांच्या आनंदाला धुमारे फुटले आहेत. मात्र, स्थानिक खरेच या घटनेबाबात काय विचार करतात, याचा विचार कुणीच करू इच्छित नाही. या सगळ्या पार्श्वभूमीचा वेध घेणारे नाटक म्हणजे ‘किश्त बहार’. राष्ट्रभूमी, मातृभूमी आणि प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा ‘सिनेमॅटिक’ अंदाजाने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे. काहीअंशी हा प्रयत्न यशस्वी ठरला असला तरी कथानकात जे पूर्णत्व हवे, प्राप्त होत नाही. अर्थात, नाट्य सादरीकरणाला अनेक मर्यादा असल्याने कदाचित ते असू शकते.
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नागपूर केंद्रावर लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सुरू असलेल्या ५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मंगळवारी सलीम शेख लिखित व दिग्दर्शित ‘किश्त बहार’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर झाले. नाटकाची सुरुवात किश्तवाडमधील नाराज काश्मिरींच्या कुप्रसिद्ध अशा दगडफेकीपासून होते. दूरचित्रवाणीवर असे प्रसंग घरबसल्या अनेकांनी बघितले आहेत. अशाच घटनेत सापडलेली काश्मिरी पंडित मुलगी आयेशा भट (आयेशा शेख) व अनेक संकटे झेलूनही आनंद मानणाऱ्या तिच्या कुटुंबीयांभोवती हे नाटक पूर्णत: केंद्रित आहे. त्याला पाकिस्तानधार्जिणा अलगाववाद, काश्मिरींना हवी असलेली स्वत:ची आझादी आणि या सगळ्यात कोणताही प्रश्न उपस्थित न करता जात, पंथ, धर्म आणि राज्यांच्या सीमा बाजूला ठेवून इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावणाºया सैनिक संघर्षाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सोबतीला प्रेमकथेची जोडही आहे. कथा रंजक आहे आणि कदाचित मयताच्या टाळूवर पोळी शेकणाºया राजकारण्यांच्या आणि मोबाईलवर कसलाही विचार न करता कलम ३७० रद्द झाल्यानंतर घरबसल्या काश्मिरींवर लज्जास्पद जोक्स तयार करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.
भारत, काश्मीर आणि प्रेम करावा असा निसर्ग यावरील संवाद टाळ्या घेणाºया ठरल्या. नाटकात बर्फवृष्टी, झिल, बर्फाच्छादित पर्वत, भारत-पाकिस्तान सीमा आणि बॉम्बस्फोट यांचे लाईव्ह दर्शन करवून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिलेला धक्का सुखावणारा आहे. या सगळ्या सिनेमॅटिक जर्नीमध्ये ३७० कलमबाबत जादा वाच्यता केली असती तर नाटकाचे सार्थक झाले असते. एवढी उणीव सोडली तर नाटक कसलेले आहे. एकूणच काय तर देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या या नाटकाच्या सुखद समारोपानंतर ‘भारत माता की जय’ असा जयघोष प्रेक्षागृहातून निघणारच. नाटकात संध्या भट्ट (संयुक्ता थोरात), सैनिक राशिद (सचिन गिरी), रंजित भट्ट (सलीम शेख), संजित भट्ट (आदेश जामनिक), गिलानी व खान (परीक्षित हरसोले), नूर (भाग्यश्री देठे), कमांडर (रोहित गिल), भाभी (रुचिता पडिया), भाई (मंगेश रौराळे), जफर (लकी वानखेडे), अतिक (पंकज काळे), आफताब (सुशील शेंडे), साहिल (तुषार सोयम), सैनिक (प्रिन्स पाटील व राहुल चव्हाण) यांच्या भूमिका होत्या. प्रकाशयोजना मिथून मित्रा, पार्श्वसंगीत हेमंत डिके, नेपथ्य सौरभ दास व राजेश काळे, रंगभूषा नलिनी बन्सोड, वेशभूषा अश्विनी पिंपळकर यांची होती. सूत्रधार म्हणून पूजा पिंपळकर यांनी सूत्र सांभाळले.

Web Title: The tragedy of Kashmiris trapped in the nation, the homeland and the land of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :artकला