वाहतूक दंड वाचविण्यासाठी ‘गोलमाल’, मर्सिडीजला लावली मुंबईतील कारची नंबरप्लेट
By योगेश पांडे | Updated: April 21, 2025 22:26 IST2025-04-21T22:25:09+5:302025-04-21T22:26:09+5:30
नागपुरात अवैध पार्किंग करताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर चौकशीतून हा प्रकार समोर आला. या प्रकरणात बापबेट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक दंड वाचविण्यासाठी ‘गोलमाल’, मर्सिडीजला लावली मुंबईतील कारची नंबरप्लेट
नागपूर : वाहतूकीचा दंड वाचविण्यासाठी नागपुरातील एका बापबेट्याने अतिशहाणपणा करत नंबरप्लेटमध्येच गोलमाल गेला. त्यांनी मूळ नंबरप्लेट काढत त्यांच्या मर्सिडीजला मुंबईच्या एका कारची नंबरप्लेट लावली. त्यामुळे नियम तोडल्यावर मुंबईच्या व्यक्तीला चालान जात होते. नागपुरात अवैध पार्किंग करताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर चौकशीतून हा प्रकार समोर आला. या प्रकरणात बापबेट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीश देवीचरण तिवारी (५०, प्रगतीशील कॉलनी, वर्धा मार्ग, साई मंदिरासमोर) व यश हरीश तिवारी (२५) अशी आरोपींची नावे आहेत. तिवारीकडे एमएच ३१ ईएक्स ९९९३ या क्रमांकाची मर्सिडीज कार आहे. मात्र नियमभंग केल्यावर चालान येऊ नये यासाठी यश तिवारीने कारची नंबरप्लेटच बदलली व एमएच ०२ डीझेड ५०६१ हा क्रमांक असलेली प्लेट लावली. परंतु हा क्रमांक मुंबईतील हनित मनजीतसिंग अरोरा (मिरा रोड) यांच्या कारचा होता. हरीश किंवा यश तिवारी कारने नियम तोडायचे व त्याचे चालान अरोरा यांच्या मोबाईलवर जात होते. त्यांनी चार वेळा नियम तोडले होते. १७ एप्रिल रोजी सोनेगाव वाहतूक परिमंडळातील सुरेंद्र पगारे हे टोईंग व्हॅनवर कर्तव्यावर होते. अलंकार चौकातील पुनम मॉलसमोर हरीश तिवारीने अरोडा यांच्या कारचा क्रमांक लावून असलेली स्वत:ची मर्सिडीज पार्क केली होती.
पगारे यांनी कारवाईसाठी ई चालान मशीनवर गाडीचे तपशील पाहिले असता ती गाडी हनित अरोरा यांच्या नावावर असल्याची बाब समोर आली. त्यांनी अरोरा यांना फोन लावला असता त्यांची मूळ गाडी तर त्यांच्या मिरा रोड येथील घरी असल्याची बाब समोर आली. दरम्यान हरीश तिवारीने पत्नीसह पोहोचल्यावर गाडी माझी असल्याचे सांगितले. पगारे यांनी दस्तावेज मागितले असता तिवारीने मुलाला बोलविले. यश तिवारी तेथे पोहोचल्यावर त्यानेदेखील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पगारे यांनी वरिष्ठांना कळवून कार सिताबर्डी वाहतूक कार्यालयात जमा केली. दुसऱ्या दिवशी तिवारी कागदपत्रे घेऊन आल्यावर गाडीचा क्रमांक एमएच ३१ ईएक्स ९९९३ असल्याची बाब स्पष्ट झाली. आरोपी बापबेट्याने दुसऱ्याच्या गाडीचा क्रमांक लावून शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पगारे यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधातही बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओव्हरस्पिडींगचे दोन चालान पोहोचले मुंबईत
तिवारीने दोनदा ओव्हरस्पिडींग केली व त्याचे चालान अरोरा यांना गेले. नागपुरातील नियमभंगाचे चालान आल्याने अरोरादेखील बुचकळ्यात पडले. अज्ञात व्यक्ती मर्सिडीजवर त्यांच्या वाहनाचा क्रमांक असलेली प्लेट लावून फिरत असल्याचे फोटोत दिसल्यावर त्यांनी काशिमिरा वाहतूक विभागात तक्रार केली होती.
डमी नंबरप्लेट वापरली तर थेट गुन्हाच
कोणत्याही वाहनचालकांनी वाहनांची मूळ नंबरप्लेट बदलवून किंवा माॅडिफाईड करून डमी नंबरप्लेट लावली तर तो गंभीर गुन्हा आहे. असे करणाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वाहतूक पोलीस आयुक्त अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले आहे.