'तो' वाघ दिसला, वनविभागाचे पथक अन् ग्रामस्थांकडून शोधमोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 17:26 IST2019-11-25T17:25:26+5:302019-11-25T17:26:01+5:30
खडका शिवारातील शर्मा यांच्या शेतातील मातीत वाघाच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले

'तो' वाघ दिसला, वनविभागाचे पथक अन् ग्रामस्थांकडून शोधमोहीम
नागपूर (हिंगणा) : गेल्या आठवड्यात मिहान परिसरात आढळलेला पट्टेदार वाघ सोमवारी हिंगणा नजीकच्या खडका शिवारात दिसून आला. खडका शिवारातील रस्त्याला लागून असलेल्या कपाशीच्या शेतात सकाळी ६.३० वाजता बुटीबोरी वनविभागाच्या पथकाला व ग्रामस्थांना वाघ दिसून आला. सदर वाघास शोधून काढण्यासाठी बुटीबोरी वनविभागाने शोधमोहीम सुरू केली होती.
खडका शिवारातील शर्मा यांच्या शेतातील मातीत वाघाच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. त्यामुळे परिसरात वाघाची उपस्थित असावी असा अंदाज वनपरिक्षेत्राधिकारी एल.व्ही. ठोकळ व राऊंड आफिसर एस. डी. त्रिपाठी यांनी बांधला. त्यांच्यासोबत अंकुश नागरगोजे ,बंडु लोणारे व राहुल वाघधरे उपस्थित होते. वनविभागाची गाडी थोडी पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला बाबुलाल लोणारे यांचे कपाशीचे शेत आहे. तेथे वाघ जाताना पथकाला दिसला. याचदरम्यान वृत्तपत्र विक्रेता राजेंद्र सांबारे हे हिंगण्यावरुन गुमगावकडे पार्सल पोहचविण्यासाठी निघाले असता त्यांनाही वाघ शेतातून रस्ता ओलांडून वेणा नदीच्या काठावर असलेल्या झुडूपांमध्ये जाताना दिसला. नंतर तो कुठे गडप झाला हे कळले नाही. वाघाची दहशत खडका, सुकळी गुपचूप व रायपूर हिंगणा परिसरातील नागरिकांत पसरली आहे. शेतकरी शेतात जायला धास्तावले आहेत. वनविभागाच्या हिंगणा पथकाने याबद्दल शोधमोहीम राबविणे गरजेचे आहे.