हंगाम नसतानाही तिकिटांचे दर तब्बल २१ हजारांवर; स्पर्धेअभावी विमान कंपन्यांचे मनमानी दर, प्रवाशांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:21 IST2025-11-07T15:21:04+5:302025-11-07T15:21:57+5:30
Nagpur : नागपुरातून सध्या मुंबईकडे दररोज आठ विमानांचे उड्डाण होते. यापैकी दोन उड्डाणे एअर इंडिया, तर सहा इंडिगो एअरलाइन्स संचलित करतात. परंतु, या दोनच कंपन्यांमध्ये असलेली स्पर्धेची कमतरता हीच तिकीट दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जाते.

Ticket prices are as high as 21 thousand even during off-season; Airlines' arbitrary prices due to lack of competition, passengers angry
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर-मुंबई मार्गावरील विमान कंपन्यांनी हंगाम नसतानाही तिकिटांचे दर तब्बल २१ हजार रुपयांवर नेले असून, प्रवाशांचा संताप वाढला आहे. गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी काही प्रवाशांना नागपूर-मुंबई प्रवासासाठी एवढे प्रचंड दर मोजावे लागले, तर शुक्रवार, दि. ७नोव्हेंबर रोजीही अनेक बुकिंग संकेतस्थळांवर हे दर कायम होते. त्यामुळे हवाई प्रवास आता फक्त सोयीसाठी नव्हे, तर 'लक्झरी' ठरत आहे.
नागपुरातून सध्या मुंबईकडे दररोज आठ विमानांचे उड्डाण होते. यापैकी दोन उड्डाणे एअर इंडिया, तर सहा इंडिगो एअरलाइन्स संचलित करतात. परंतु, या दोनच कंपन्यांमध्ये असलेली स्पर्धेची कमतरता हीच तिकीट दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जाते. विमान कंपन्या बुकिंगची संख्या आणि वेळेनुसार दर ठरवतात. मात्र नागपुरात प्रवाशांसाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्याने कंपन्या मनमानी दर आकारतात आणि प्रवाशांना हतबल होऊन तिकिटे घ्यावी लागतात.
दिवाळीतही तिकीट दरांचा खेळ
दिवाळीपूर्वी पुणे-नागपूर मार्गावरील विमान तिकिटांचे दर ४० हजारांपर्यंत पोहोचले होते. त्याच काळात खासगी बसचालकांनीही प्रवाशांकडून ६ हजारांपर्यंत दर आकारले होते. त्यावेळी विविध प्रवासी संघटनांनी विमान तिकीट दरांवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली आखावी, अशी मागणी केली होती; मात्र त्यानंतर या मागणीकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही.
मेट्रो शहरांपेक्षा दर तिपटीने जास्त
धनलक्ष्मी ट्रॅव्हल्सचे संचालक मार्मिक शेंडे म्हणाले, दिल्ली, मुंबई, पुणे किंवा बंगळुरूसारख्या महानगरांत विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा असल्यामुळे तेथे नागपूरसारख्याच अंतराचे हवाई तिकीट केवळ ४ ते ५ हजार रुपयांत मिळते. परंतु नागपुरातून प्रवास करताना त्याच नागपुरातून मार्गासाठी २० ते २१ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. म्हणजे जवळपास चौपट दर द्यावा लागतो. यामुळे सामान्य प्रवाशांना हवाई प्रवास परवडत नाही. अनेकजण रेल्वे किंवा बसने प्रवास करण्यास भाग पडतात. त्याचा फटका बुकिंग एजंटांना बसतो.