नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन कनिष्ठ लिपिकांना अटक, अटकेतील एकूण आरोपींची संख्या झाली २४
By योगेश पांडे | Updated: November 19, 2025 22:13 IST2025-11-19T22:12:58+5:302025-11-19T22:13:15+5:30
ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती.

नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन कनिष्ठ लिपिकांना अटक, अटकेतील एकूण आरोपींची संख्या झाली २४
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिसांनी बऱ्याच दिवसांनी कारवाई करत तीन कनिष्ठ लिपिकांना अटक केली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. तपासादरम्यान तीन कनिष्ठ लिपिकांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक, तत्कालिन शिक्षणाधिकारी व तत्कालिन शिक्षण उपसंचालकांशी संगनमत करून बनावट शालार्थ आयडी तयार करून नोकरी मिळविली. त्यानंतर वेतन घेत त्यांनी शासनाची कोट्यवधींची फसवणूक केली. पोलिसांनी यात चरणदास प्रायमरी शाळेतील कनिष्ठ लिपीक जगदीश दिनकरराव ढेंगे (३५, मंगलदीप नगर, मानेवाडा बेसा मार्ग), भांडेवाडीतील जगन्नाथ पब्लिक स्कूलमधील कनिष्ठ लिपीक यशवंत धकाते (३५, विणकर वसाहत, मानेवाडा बेसा मार्ग) व वाठोडा ले आऊटमधील विद्या विकास उच्च प्राथमिक शाळेतील कनिष्ठ लिपीक अक्षय संजय मांडे (३१, भगवाननगर, बॅंक कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बुधवारी अटक केली.
शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या आता एकूण २४ इतकी झाली आहे. यात तीन शिक्षण उपसंचालक, तीन शिक्षणाधिकारी, एक वेतन अधीक्षक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, तीन सहायक शिक्षक, सहा लिपीक व तीन कनिष्ठ लिपीकांचा समावेश आहे.