खंडणीसाठी दारू दुकान चालकाला धमकावले, ग्राहकाला लुटून पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:00 IST2023-11-27T15:59:50+5:302023-11-27T16:00:00+5:30

आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला व पाचही जणांना अटक

Threatened the liquor shop driver for extortion, robbed the customer and ran away | खंडणीसाठी दारू दुकान चालकाला धमकावले, ग्राहकाला लुटून पळाले

खंडणीसाठी दारू दुकान चालकाला धमकावले, ग्राहकाला लुटून पळाले

नागपूर : देशी दारूच्या दुकानात हप्ता वसुलीसाठी आलेल्या आरोपींनी एका ग्राहकालाच लुटून पळ काढला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

राजीवनगर स्मशानघाटावजळ देशी दारूचे दुकान आहे. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तेथे अक्षय दयाराम सूर्यवंशी (२४, राजीवनगर), आकाश उर्फ राहुल कमलेश सिंग (२४, राजीवनगर), आतीश गरीबदास शेंडे (२५, वैशालीनगर), सोनू उर्फ वसीम रफीक खान (२२, राजीवनगर), तुषार गणेश पेंदाम (२३, गोंड मोहल्ला) हे आरोपी पोहोचले. त्यांनी चाकू दाखवत दुकानातील कर्मचाऱ्यांना हप्ता मागितला. जर दुकान चालवायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यावेळी तेथे संजय शेंडे (४०) हे ग्राहक उभे होते. आरोपींनी त्यांना चाकू दाखविला व त्यांच्या पॅंटच्या खिशातून साडेचार हजार रुपये हिसकावून पळ काढला. जर पोलिसांकडे तक्रार केली तर जिवे मारू, अशी धमकीदेखील दिली. त्यानंतर आरोपी पळून गेले. शेंडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला व पाचही जणांना अटक केली.

Web Title: Threatened the liquor shop driver for extortion, robbed the customer and ran away