“ही प्रार्थना म्हणजे भारतमातेप्रती भक्ती.. " इंग्रजांनी भारतमातेच्या प्रार्थनेला संगीतबद्ध करणे हे एक बोनसच
By गणेश हुड | Updated: September 27, 2025 19:08 IST2025-09-27T18:59:44+5:302025-09-27T19:08:58+5:30
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत : संघ प्रार्थना ध्वनिचित्रफीत लोकार्पण

"This prayer is devotion to Mother India.." The fact that the British set the prayer to Mother India to music is a bonus.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना ही प्रत्यक्षात भारतमातेची प्रार्थना आहे. यात प्रथम भारतमातेला वंदन केले आहे आणि नंतर तिच्यासाठी परमेश्वराकडे मागणी केली आहे,” असे मत व्यक्त करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, लंडन येथील रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या वादकांनी याला स्वरसाज चढविला आहे. इंग्रजांनी असे करणे हे एक बोनसच आहे.
इंग्रजी कॅलेंडरनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २७ सप्टेंबरला १०० वर्षे पूर्ण झाली या पार्श्वभूमीवरसंघाची प्रार्थना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने तयार करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफीतेचे लोकार्पण शनिवारी डॉ. हेडगेवार स्मृती भवनातील महार्षी व्यास सभागृहात मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले
या प्रसंगी प्रकल्प प्रमुख व संगीतकार राहुल रानडे, उद्घोषक हरीश भिमानी, अभिनेते सचिन खेडेकर, विवेक आपटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे व इंद्रनील चितळे उपस्थित होते. संघ प्रार्थनेला स्वर देणारे विख्यात गायक शंकर महादेवन यांचा व्हिडिओ संदेश यावेळी प्रदर्शित करण्यात आला.
डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात प्रार्थनेच्या इतिहासावर प्रकाश टाकला , प्रार्थना ही देश व ईश्वर यांच्याप्रती स्वयंसेवकांचा सामूहिक संकल्प आहे. “ही प्रार्थना म्हणजे भारतमातेप्रती भक्ती, प्रेम आणि समर्पणाचे प्रकटीकरण आहे. यात आपण देशाला काय देऊ शकतो हे सांगितले आहे. देशसेवा करण्यास मदत व्हावी अशी भगवानकडे प्रार्थना केली जाते. ही प्रार्थना एक भावना आहे जी मातृभूमीप्रती भक्ती, प्रेम व समर्पणाच्या सामूहिक संकल्पात स्वयंसेवकांना मदत करते,” असे ते म्हणाले. “या प्रार्थनेचा अर्थ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी विविध भारतीय भाषांमध्ये अर्थ स्पष्ट करणारी ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली आहे,” असेही त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन आशुतोष अडोणी यांनी तर आभार इंद्रनील चितळे यांनी मानले.
ध्वनिचित्रफीतीचे वैशिष्ठये
- संघ प्रार्थनेच्या ध्वनिचित्रफीतीला शंकर महादेवन यांनी स्वर दिला आहे.
- हिंदी अनुवाद हरीश भिमानी यांनी, तर मराठी अनुवाद सचिन खेडेकर यांनी केला आहे.
- संगीतकार राहुल रानडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रस्तुतीत प्रार्थनेचे इतर भारतीय भाषांतील अनुवादही सामाविष्ट असतील.
- लंडनच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या वादकांनी याला स्वर सज्जा केली आहे.
- ध्वनिमुद्रण लंडनच्या एबी रोड स्टुडिओ व मुंबईच्या यशराज फिल्म्स मध्ये झाले.
- ध्वनिमिश्रण व मास्टरिंग विजय दयाल यांनी, तर संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले.
- आमदार सिद्धार्थ शिरोले व इंद्रनील चितळे यांनी या प्रकल्पाच्या साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कोण काय म्हणाले?
- आपल्या भाषणात सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “मी निवडणुकीच्या कामासाठी पश्चिम बंगालला गेलो असता, मला असे वाटले की मी दुसऱ्या देशात आलो आहे. त्यामुळे संघाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे.”
- संगीतकार राहुल रानडे म्हणाले, “संघ प्रार्थना तयार झाली तेव्हा देशावर इंग्रजांचे राज्य होते. आज भारतमातेच्या या प्रार्थनेला साकार करण्यासाठी इंग्रजांनीच योगदान दिले आहे.”
- उद्घोषक हरीश भिमानी म्हणाले, “हा पुनीत कार्यभाग गीतेने मला करवून घेतला. गीता ही जीवन जगण्याची कला शिकवते आणि मार्गदर्शन करते.”