नरेश डोंगरे, नागपूरआमच्या कार्यक्षेत्रात कुण्या प्रकल्पात काय सुरू आहे, काय नाही, त्या संबंधाने समाधानकारक माहिती मिळत नाही. अधिकाऱ्यांचं वागणं सौजन्यपूर्ण नाही, अशा आशयाचा सूर लावत ठिकठिकाणच्या खासदारांनीरेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे तीव्र नाराजी नोंदवली. शुक्रवारी नागपुरात हा प्रकार घडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांसोबत एक बैठक घेतली जाते. खासदारांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या रेल्वेच्या विविध विकास कामांचा यात आढावा घेतला जातो.
रेल्वेच्या महाव्यवस्थापकासोबतच्या बैठकीला कोणते खासदार होते?
खासदारांकडून या संबंधाने काही सूचना किंवा काही अडचणी असेल त्या नोंदवल्या जातात. शुक्रवारी नागपुरात झालेल्या बैठकीला रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे, अमर काळे (वर्धा), संजय देशमुख (यवतमाळ), बळवंत वानखेडे (अमरावती), अनूप धोत्रे (अकोला), डॉ. शोभा बच्छाव (धुळे), राजाभाऊ पराग, प्रकाश वाजे (नाशिक), भास्कर भागरे (दिंडोरी), बंटी साहू (छिंदवाडा) आणि दर्शनसिंग चौधरी (होशंगाबाद) तसेच मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मिना आणि विविध विभागाचे प्रमुख, नागपूर विभागाचे व्यवस्थापक विनायक गर्ग आणि भुसावळ विभागाच्या व्यवस्थापक ईती पांडे उपस्थित होत्या.
खासदारांनी व्यक्त केला संताप
स्वागताची औपचारिकता पार पडल्यानंतर मात्र वातावरण गरम झाले. लोकप्रतिनिधींपैकी अनेकांनी आपापल्या क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पाचा विषय मांडला. त्यासंबंधाने काही अडचणी असेल, त्या मार्गी लावाय्या असेल तर अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे महाव्यवस्थापकांना सांगितले.
काही अधिकारी तोऱ्यात वावरतात, असा अनेकांचा सूर होता. ही बैठक सहा महिन्यांपुर्वीच व्हायला हवी होती, ती आता १० महिन्यानंतर होत आहे. रेल्वे अंडर ब्रीज, लेवल क्रॉसिंग गेट आणि अशाच काही त्रुट्यांबाबत खास. बर्वे यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बैठकीचा व्हिडीओ
या संबंधाने खासदार बर्वे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी अधिकाऱ्यांच्या वर्तनासंबंधाने नाराजीचा सूर आळवला. विशेष म्हणजे, बर्वे यांनी आज या बैठकीचा व्हिडीओ देखील त्यांच्या फेसबुकवर अपलोड केला. त्यात ते अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत.
ईन कॅबिनमध्ये वातावरण गरम
बैठक अशी गरम झाल्यानंतर महाव्यवस्थापक मिना यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत केलेल्या 'ईन कॅबिन'चर्चेतही वातावरण गरम झाल्याचे समजते.
या संबंधाने रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी निला यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बैठकीला विलंब, एलसी गेटची समस्या, यावर थोडीफार नाराजी व्यक्त झाल्याचे मान्य केले. मात्र, बैठकीत गरमागरम असे काहीही घडले नसल्याचे म्हटले.