चोरट्यांना ‘ड्रायफ्रूट्स’चा मोह, किराणा दुकानातील पावणेनऊ किलो काजू-पिस्ता-बदामवर डल्ला

By योगेश पांडे | Updated: April 22, 2025 16:28 IST2025-04-22T16:26:55+5:302025-04-22T16:28:16+5:30

Nagpur : आरोपींनी सिगारेटची तीस पाकिटेदेखील नेली

Thieves lured by 'dry fruits', 25 kg of cashews, pistachios and almonds stolen from grocery store | चोरट्यांना ‘ड्रायफ्रूट्स’चा मोह, किराणा दुकानातील पावणेनऊ किलो काजू-पिस्ता-बदामवर डल्ला

Thieves lured by 'dry fruits', 25 kg of cashews, pistachios and almonds stolen from grocery store

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
चोरट्यांनी एक किराणा दुकान फोडून तेथील रोख रकमेसह पावणेनऊ किलो सुक्या मेव्याच्या पाकिटांवरदेखील डल्ला मारला. ‘फिटनेस’ व पौष्टिक आहाराबाबत जागृती वाढत असतानाच चोरट्यांनादेखील सुक्या मेव्याचा मोह आवरता आला नाही की काय असाच सवाल यातून उपस्थित होत आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

आनंद अग्रवाल (३७, पांडे ले आऊट) यांचे श्यामनगर येथे आनंद सेल्स कॉर्पोरेशन नावाचे किराणामालाचे दुकान आहे. १८ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी दुकान बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातून जवळपास २५ हजारांची रोख लंपास केली. तसेच दुकानातून इतर वस्तूंना हात न लावता केवळ सुक्या मेव्याची पाकिटेच चोरली. चोरट्यांनी तीन किलो बदाम, तीन किलो काजू, पावणे दोन किलो पिस्ता, एक किलो अक्रोडची पाकिटे उडविली. सोबतच आरोपींनी सिगारेटची तीस पाकिटेदेखील नेली. दुसऱ्या दिवशी दुकानाशेजारी असलेल्या भाजीविक्रेत्याला शटर तुटलेले दिसले. त्याने अग्रवाल यांना फोन लावून माहिती दिली. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thieves lured by 'dry fruits', 25 kg of cashews, pistachios and almonds stolen from grocery store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.