लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीनवेळा माझी भेट घेतलेली आहे. प्रत्येक भेट वेगवेगळ्या कारणांसाठी होती. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजित पवार आणि एकनाथराव शिंदे करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाची शक्यता फेटाळली.
माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होण्याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात असता पत्रकारांनी त्यांना मुंडे यांच्या प्रवेशाबाबत विचारणा केली होती. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, जी काही घटना घडली त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. चर्चेअंती त्यांचं खातं बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु, यापुढे मंत्र्यांचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. कारवाई होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. आणखी खातेबदल होणार का? असे विचारले असता, याबाबत कुठलीही चर्चा नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
यूपीएने मताच्या राजकारणासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली
- २००८ सालचं षडयंत्र आता सर्वांसमोर उघड झालंय. त्यावेळच्या यूपीए सरकारने मतांच्या राजकारणासाठी हिंदू टेरर, भगवा दहशतवाद हे शब्द तयार केले. हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
- मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "१९९० च्या दशकाच्या २ शेवटच्या भागात आणि साधारणतः २०००च्या सुरुवातीला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडल्या. अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादाच्या घटना घडल्या.
- यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते. त्यातून इस्लामिक टेररिजमच नरेटिव तयार झालं. ते भारताने तयार केलं नव्हतं." "भारतात या नरेटिवचा आपल्या व्होटबँकेवर परिणाम होतोय हे काँग्रेसच्या लक्षात आलं.
- कोणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवलं नव्हतं, पण तरीदेखील या ठिकाणी सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं यूपीएने षडयंत्र स्चलं.
- हिंदू दहशतवाद हा शब्द तयार केला. आम्हाला मतदान करणारे जे लोक आहेत, त्यांच्या मनात राग निर्माण होऊ नये किंवा त्यांना वाटावं आम्ही बॅलन्स करतोय, यासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनविण्यात आली.
- लोकांना अटक केली. हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी, पदाधिकारी यांना टार्गेट करण्याचं हे षडयंत्र होतं, असा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.