... तर हजाराे विद्यार्थी सरकारी लाभापासून राहतील वंचित ! यु-डायसमध्ये नाेंदणीसाठी पाच दिवस बाकी
By निशांत वानखेडे | Updated: September 25, 2025 20:38 IST2025-09-25T20:37:31+5:302025-09-25T20:38:43+5:30
यु-डायसमध्ये नाेंदणीसाठी उरले पाच दिवस : एंट्री टॅबच उपलब्ध नाही : शिक्षकही अतिरिक्त ठरण्याची शक्यता

...then thousands of students will be deprived of government benefits! Five days left to register for U-DICE
नागपूर : दरवर्षी अनेक शाळांमध्ये नवीन विद्यार्थी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांची ‘यु-डायस’मध्ये नाेंदणी करावी लागते. तेव्हाच त्यांना गणवेश, माेफत पुस्तका आदींचा लाभ मिळताे. त्यासाठी न्यू एंट्री टॅब उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. यु-डायस प्रणालीमध्ये नाेंदणीसाठी पाच दिवस बाकी असताना न्यू एंट्री टॅब उपलब्ध न झाल्याने हजाराे विद्यार्थी नाेंदणीसह सरकारी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाने नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ताबडताेब न्यू एंट्री टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षण संचालकाकडे केली आहे. महासंघाचे राज्य सचिव बाळा आगलावे यांनी सांगितले, शैक्षणिक सत्र २०२५- २६ ची संचमान्यता ३० सप्टेंबरच्या आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येवर होणार असल्याने आधार नोंदणी, आधार दुरुस्ती ,आधार अद्यावतीकरण करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी निर्गमित केलेल्या आहे.
अनेक शाळा दरवर्षी नवीन विद्यार्थी प्रवेश घेतात. ते ज्या शाळेमधून आलेले असतात, त्या शाळांकडे रिक्वेस्ट पाठवून ते विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळेत आणण्याची सुविधा यु-डायस प्रणालीत देण्यात आलेली आहे. परंतु नव्याने प्रवेश घेणारे तसेच मागील वर्षी इतर दुसऱ्या कोणत्याही शाळेत नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शासनाकडून न्यू एंट्री टॅब उपलब्ध करून देण्यात येतो. त्यावरून नवीन प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांची यु-डायस प्रणालीत नोंदणी करण्यात येते. परंतु यावर्षीच्या संचमान्यतेसाठी पाच दिवस शिल्लक राहिलेले असतानाही शासकडून अद्यापही न्यू एंट्री टॅब उपलब्ध करून दिला नसल्याने नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद शाळांना करता आलेली नाही.
जर वेळत न्यू एन्ट्री टॅब उपलब्ध करून दिला गेला नाही, तर नवीन प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची यु-डायस प्रणालीत नोंद होणार नाही. तसेच ते विद्यार्थी संचमान्यतेसाठी गृहीत धरले जाणार नाही. त्यामुळे हे विद्यार्थी शासनाच्या योजनांच्या लाभांपासून वंचित राहतील. करिता नागपूर जिल्ह्यातील नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यु-डायस प्रणालीत नोंद करता यावी, याकरिता न्यू एन्ट्री टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी महासंघाने निवेदनाद्वारे शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत शिक्षण संचालकांना केली आहे. शिष्टमंडळात शहर अध्यक्ष चौधरी, शहर सचिव अब्दुल कौसर, ग्रामीण सचिव प्रवीण रेवतकर , जिल्हा संघटक विवेक डोंगरे, ग्रामीण कोषाध्यक्ष जयप्रकाश तवले व बंडू भैसारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.