८ डिसेंबरपासून नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन; कोणकोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
By शुभांगी काळमेघ | Updated: October 4, 2025 20:12 IST2025-10-04T20:11:59+5:302025-10-04T20:12:26+5:30
Nagpur : सरकारच्या धोरणांवर विरोधकांकडून कडाडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असून, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज दरवाढ, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर अधिवेशनात तीव्र चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

The winter session will be held in Nagpur from December 8; what issues will be discussed?
नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्य सरकारने या अधिवेशनासाठी तयारीला सुरुवात केली असून, नागपूर शहर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू ठरणार आहे. अधिवेशनात राज्यातील महत्त्वाचे कायदे, वित्तीय विषय, जनहिताचे प्रश्न आणि विभागीय विकास या मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी अधिवेशनाची पार्श्वभूमी राजकीय घडामोडींनी गहिरी झाली आहे. सरकारच्या धोरणांवर विरोधकांकडून कडाडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असून, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज दरवाढ, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर अधिवेशनात तीव्र चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
राज्य शासनाकडून अधिवेशनासाठी सुरक्षेच्या तसेच लॉजिस्टिक दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनासाठी सर्व सदस्यांना सूचना पाठवल्या असून, नागपूरमध्ये रेल्वे व हवाई सेवांमध्येही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढ होण्याची शक्यता आहे.
अधिवेशनाच्या काळात नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. अनेक मंत्र्यांचे निवास आणि कार्यालये याठिकाणी काही काळासाठी हलवण्यात येणार आहेत. तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र मीडिया सेंटरचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांसाठी हे अधिवेशन आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अनेक राजकीय घोषणांची शक्यता असून, जनता, कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागून राहिले आहे.