संपूर्ण देश व देशातील प्रत्येक व्यक्ती हेच मोदींचे कुटुंब- स्मृती इराणी

By योगेश पांडे | Published: March 4, 2024 09:25 PM2024-03-04T21:25:50+5:302024-03-04T21:26:32+5:30

भाजयुमोच्या राष्ट्रीय महासंमेलनातून विरोधकांवर टीकास्त्र

The whole country and every person in the country is Modi's family - Smriti Irani | संपूर्ण देश व देशातील प्रत्येक व्यक्ती हेच मोदींचे कुटुंब- स्मृती इराणी

संपूर्ण देश व देशातील प्रत्येक व्यक्ती हेच मोदींचे कुटुंब- स्मृती इराणी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: इंडी आघाडीच्या घटकपक्षातील राजदचे नेते लालुप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंबच नसल्याच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये संतापाचा सूर आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या महासंमेलनातून विरोधकांवर याच मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले. मागील अनेक वर्षांपासून पंतप्रधान हे देशालाच आपले कुटुंब मानून संघर्ष करत आहेत. घोटाळे करणाऱ्या लालूप्रसाद यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती, तरुण इतकेच काय संपूर्ण देशच नरेंद्र मोदी यांचे कुटुंबच आहे, असे प्रतिपादन इराणी यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सोमवारी आयोजित महासंमेलनादरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, खा.नवनीत राणा, माजी खासदार अजय संचेती प्रामुख्याने उपस्थित होते. संपुआच्या कार्यकाळात देशात अनेक समस्या होत्या. मात्र मागील वर्षात देशात वेगाने विकास झाला आहे. आता लवकरच निवडणूका होतील. प्रचारादरम्यान तथ्यहीन बाबी जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होईल. अगदी एआय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दुष्प्रचार करण्यात येईल. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मी उघडपणे चर्चेचे आव्हान देते. ते माझ्याशी चर्चेला तर येणार नाही. मात्र भाजयुमोच्या सामान्य कार्यकर्तादेखील त्यांच्यासमोर परखडपणे सत्य मांडू शकतो, असे इराणी म्हणाल्या. देशात युवाकेंद्रीत विकास सुरू आहे. राजकीय प्रणालीत स्थिरता असल्यामुळे देश विकासाकडे झेप घेत आहे, असे प्रतिपादन तेजस्वी सूर्या यांनी केले.

भाजप नव्हे भारताच्या विजयासाठी काम करा : फडणवीस

कॉंग्रेसने गरिबी हटाओचा नारा सुरुवातीपासून दिला. मात्र प्रत्यक्षात गरीबच वाढत गेले. मागील १० वर्षांत २५ कोटी जनता गरीबी रेषेच्या वर आली आहे. जगात मंदी असताना भारत विकासाकडे झेप कशी काय घेत आहे याचा विचार अर्थतज्ज्ञ करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांना सक्षम करत अर्थव्यवस्था विकसित केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूका या भाजपच्या नव्हे तर भारताच्या विजयासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विकासप्रकल्पांना कॉंग्रेस, पवारांकडून विरोध : गडकरी

मागील १० वर्षांतील केंद्र शासनाची कामगिरी व ६५ वर्षांत कॉंग्रेसने केलेले काम याची तुलना केली असता नेमके सत्य सहजपणे समोर येते. मागील १० वर्षांत देशातील पोर्ट, विमानतळे, महामार्ग, शिक्षण, वैद्यकीय सेवांचा मोठा विस्तार झाला आहे. नागपुरातील मिहानची संकल्पना आम्ही समोर आणून काम सुरू केले होते तेव्हा कॉंग्रेस व शरद पवारांनी विरोध करत आंदोलन केले होते. मात्र आता त्याच मिहानमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या असून ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करत त्यांच्या स्वाभिमान निर्माण करणारी अर्थव्यवस्था झाली आहे. देशात स्मार्ट सिटीसोबत स्मार्ट व्हिलेजदेखील बनत आहे. केवळ खोटी आश्वासने देऊन काही होत नाही. आम्ही आमच्या सरकारच्या कामावर निवडून आलो आहे. योग्य निती व नेता देशाकडे आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

Web Title: The whole country and every person in the country is Modi's family - Smriti Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.