Hareram Tripathi Accident: रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी (वय ५२) आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी (वय ३५) यांचा एका भीषण कार अपघातातमृत्यू झाला. पत्नीसह गावी जात असलेल्या त्रिपाठी यांच्यावर काळाने रस्त्यातच झडप घातली. शनिवारी पहाटे ५.४० वाजेच्या सुमारास उत्तर प्रदेशातील महूच्या दोहरीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुलगुरू हरेराम त्रिपाठी हे त्यांच्या पत्नी बदामी देवी यांच्यासह कुशीनगर जिल्ह्यातील चकिया बाघुजघाट येथील मूळगावी निघाले होते. मात्र, त्यांची कार वाराणसी-गोरखपूर चौपदरी महामार्गावर एका उभ्या असलेल्या ट्रेलरला जाऊन धडकी. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
चालक गंभीर जखमी
कार अपघातात कुलगुरू त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचा कार चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात पाठवले.
कार चालकाला तातडीने दोहरीघाट येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी कार आणि ट्रेलर दोन्हीही जप्त केले.
चालकाला झोप येत होती म्हणून स्वतःच कार चालवायला बसले
कुलगुरू हरेराम त्रिपाठी हे इनोव्हा कारमधून निघाले होते. त्यांचा कारचालक वैभव मिश्रा (वय ३५) याला झोप येऊ लागल्याने हरेराम त्रिपाठी हे स्वतःच कार चालवत होते. कारचालक मागच्या सीटवर जाऊन बसला. त्यामुळे त्यांच्या पत्नी बदामी देवीही समोरच्या सीटवर येऊन बसल्या. त्रिपाठी कार चालवत असतानाच हा अपघात झाला. त्यात पती-पत्नी ठार झाले, तर चालक गंभीर जखमी झाला.
त्रिपाठी यांचा कारचालक वैभवने सांगितले की, सलग प्रवास केल्यामुळे मला झोप यायला लागली होती. त्यामुळे ते मला मागच्या सीटवर आराम कर म्हणाले आणि स्वतः कार चालवत होते. वाराणसी-गोरपूर रस्त्यावर एक ट्रेलर टायर पंक्चर झाल्यामुळे उभा होता. तो दिसला नाही आणि कार त्यावर जाऊन आदळली.