विद्यार्थ्यांच्या मनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; संविधानाचे धडे देणारे नागपूर देशातील पहिले विद्यापीठ ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:57 IST2025-04-29T11:56:17+5:302025-04-29T11:57:05+5:30
Nagpur : चारही विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या जवळपास ३५० अभ्यासक्रमांत भारतीय संविधान या विषयाचा समावेश

The values of the Indian Constitution will be instilled in the minds of students; Nagpur will be the first university in the country to offer lessons on the Constitution
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधान शिकता येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २ क्रेडिटचा अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला आहे. भारतीय संविधानाचा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे देशातील पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे.
भारताच्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना विद्यापीठात प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान विषय सर्वच अभ्यासक्रमाकरिता लागू करण्यात आला आहे. विद्यापीठातील जवळपास ३ लाख विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधानाचे धडे दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या चारही विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या जवळपास ३५० अभ्यासक्रमांत भारतीय संविधान या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाचे प्राचार्य व विधि अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविशंकर मोर यांनी ही संकल्पना तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांच्यापुढे मांडली होती. तेव्हापासून या दिशेने कार्य सुरू झाले. सर्वच अभ्यास मंडळांनी याला मंजुरी दिली. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदल करून बीए, बीकॉम, बीएस्सी आदी पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सेमिस्टरमध्ये उन्हाळी २०२५ परीक्षेत हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच सर्व अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात आला असून, याची परीक्षादेखील होणार आहे. अशाप्रकारे व्हॅल्यू एडिशन (२ क्रेडिट) अभ्यासक्रम प्रत्येक पदवीत सुरू करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भारतातील एकमेव विद्यापीठ आहे.
तीन भाषांत पुस्तक उपलब्ध
"भारतीय संविधान विषयाचा नेमका कोणता अभ्यास करावा, अशी चिंता विज्ञान, वाणिज्य, कला अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना होत असल्याने संक्षिप्त, परंतु महत्त्वाचे असे ३० ते ४० पानांत समजणारे छोटे पुस्तक हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेमध्ये विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरदेखील ते निःशुल्क उपलब्ध राहणार आहे."
- डॉ. रविशंकर मोरे, प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर.