संविधान ज्या टाइपरायटरवर टाइप केले गेले, तो सध्या नागपुरातील चिचोलीच्या शांतिवनात कसे आले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:12 IST2025-11-26T09:11:54+5:302025-11-26T09:12:45+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे ‘संविधान’ दिल्लीमध्ये लिहिले आणि त्या काळातील टाइपरायटरवर स्वतःच्या हाताने टाइप केले होते.

संविधान ज्या टाइपरायटरवर टाइप केले गेले, तो सध्या नागपुरातील चिचोलीच्या शांतिवनात कसे आले?
नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्या काळात देशाला योग्य असे ‘संविधान’ देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. हे संविधान ज्या टाइपरायटरवर टाइप केले गेले, तो टाइपरायटर सध्या नागपुरातील चिचोली येथील शांतिवनमधील डॉ. बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयात जपून ठेवण्यात आला आहे. बाबासाहेबांशी संबंधित इतर अनेक वस्तूही येथे संग्रहित आहे. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी लाखो नागरिक शांतिवनला भेट देतात.
नागपूरमध्ये कसे आले?
चिचोली शांतिवनाचा कार्यभार पाहणारे संजय पाटील यांच्यानुसार १९९१ साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खासगी सचिव नानकचंदजी रत्तू यांनी बाबासाहेबांचे सर्व साहित्य भारतीय बौद्ध परिषदेचे सचिव वामनराव गोडबोले यांच्याकडे सुपूर्द केले. गोडबोले यांना दानात मिळालेल्या जमिनीवर शांतिवनाची उभारणी करण्यात आली आणि त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोट, खुर्ची, टोपी, टाय, पेन, कप, बूट, मोजे इत्यादी वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः केले टाइप
देश घडविण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी ‘संविधान’ लिहून केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘संविधान’ पूर्ण झाले आणि २६ जानेवारी १९५० या गणतंत्रदिनी डॉ. बाबासाहेबांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देशाचे ‘संविधान’ सुपूर्द केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे ‘संविधान’ दिल्लीमध्ये लिहिले आणि त्या काळातील टाइपरायटरवर स्वतःच्या हाताने टाइप केले होते.
संविधान टाइप केलेला टाइपरायटर विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे दोन टाइपरायटर आहेत. एका टाइपरायटरवर ‘देशाचे संविधान’ टाइप केले, तर दुसऱ्यावर ‘द बुद्धा अँड हिज धम्मा’ हा ग्रंथ टाइप केला होता.