सूर्याचे चटके पुन्हा वाढले; पारा ४३ अंशावर; मान्सूनही लांबणार
By निशांत वानखेडे | Updated: June 6, 2023 18:59 IST2023-06-06T18:59:03+5:302023-06-06T18:59:27+5:30
Nagpur News ढगाळ वातावरणामुळे दाेन दिवस दिलासा देणाऱ्या सूर्याचे चटके मंगळवारी पुन्हा वाढले. ढगांची हजेरी असली तरी उन्हाच्या झळा तीव्रपणे जाणवत हाेत्या.

सूर्याचे चटके पुन्हा वाढले; पारा ४३ अंशावर; मान्सूनही लांबणार
नागपूर : ढगाळ वातावरणामुळे दाेन दिवस दिलासा देणाऱ्या सूर्याचे चटके मंगळवारी पुन्हा वाढले. ढगांची हजेरी असली तरी उन्हाच्या झळा तीव्रपणे जाणवत हाेत्या. २४ तासात पाऱ्याने उसळी घेत ४३ अंशाचा टप्पा पुन्हा गाठला. हे तापदायक वातावरण पुढचे तीन ते चार दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविले आहे.
गेली काही दिवस विदर्भात ढगांचा खेळ चालला हाेता. ही मान्सूनपूर्व रिमझिम असल्याचे बाेलले जात हाेते. मात्र दाेन दिवसात सूर्याने पुन्हा डाेळे वटारले आहेत. त्यामुळे केवळ अकाेला, अमरावती वगळता इतर जिल्ह्यात तापमानात आंशिक वाढ झाली आहे. नागपुरात २४ तासात १.४ अंशाची वाढ झाली. ब्रम्हपुरीत सर्वाधिक ४३.८ अंश व चंद्रपुरात ४३.६ अंश कमाल तापमान नाेंदविले गेले. गाेंदिया, वर्धा येथील पारा नागपूरप्रमाणे ४३ अंशावर हाेता. आतापर्यंत सरासरीच्या खाली असलेले रात्रीचे तापमानही वधारले आहे.
दरम्यान बदलणाऱ्या वातावरणीय घडामाेडींमुळे मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या दाेन दिवसात अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाली आहे. केरळमध्ये ४ जूनपर्यंत मान्सून दाखल हाेण्याची अपेक्षा हाेती पण नव्या परिस्थितीमुळे मान्सून अंदमानात रेंगाळला आहे. त्यामुळे ताे राज्यात आणि विदर्भातही काहीसा उशीरा दाखल हाेण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा पावसाच्या प्रमाणावर परिणाम हाेणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.