वाहतुकीच्या 'सुरक्षिततेचे रिपोर्ट कार्ड' तुमचे डोळे उघडेल ! नागपूर वाहतुकीसाठी किती धोकादायक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:25 IST2025-07-08T18:24:13+5:302025-07-08T18:25:06+5:30
'आयटीडीपी'चा सर्वेक्षण अहवाल : महापालिका कसे देणार आव्हानांना तोंड?

The 'Safety Report Card' of Traffic will open your eyes! How dangerous is Nagpur for traffic?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. आयटीडीपी (इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अॅण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी) संस्थेने केलेल्या या अभ्यासानुसार, नागपुरातील केवळ वर्धा रोड वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. तर सेंट्रल बाजार रोड, शंकरनगर रोड, अमरावती रोड, ऑरेंज सिटी रोड आणि रिंग रोड हे रस्ते प्रवाशांसाठी अपुऱ्या सुरक्षिततेमुळे धोकादायक ठरत असल्याचे अहवालात नमूद आहे.
मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयटीडीपी संस्थेने शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण केले. या अभ्यासाचा अहवाल नुकताच सोमवारी प्रसिद्ध झाला, रस्त्यांचे संचालन, सुरक्षा, सुलभता आणि सर्वसमावेशकता या निकषांवर आधारित या सर्वेक्षणात वर्धा रोड वगळता बाकी रस्त्यांनी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. रहाटे कॉलनी चौक ते अजनी चौक या १.३ किलोमीटर लांबीच्या पट्टयाला ३० पैकी तब्बल २४.७५ गुण मिळाले आहेत. डिझाइनपासून निरीक्षणापर्यंत बहुतेक निकषांवर हा रस्ता उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, ८० टक्के नागरिकांनी या पट्टयाला 'चालण्यासाठी, सायकलसाठी व वाहतुकीसाठी सुरक्षित' असल्याचं मान्यता दिली आहे. या रस्त्यावर पायी चालणारे नागरिक प्रामुख्याने फुटपाथवरूनच चालताना दिसून आले. नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट (एनएमटी) साठी स्वतंत्र पट्टा असून बसण्यासाठी व चालण्यासाठी योग्य व्यवस्था आहे. तसेच, जंक्शनही सुरक्षित असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मात्र, काही ठिकाणी फुटपाथवर पार्किंग आढळली असून सायकलिंगसाठी अजूनही विशेष व्यवस्था नाही, हा कमीपणाही अधोरेखित करण्यात आला आहे.
पायी चालणाऱ्यांना, सायकलस्वारांना सुरक्षित नाही
वर्धा रोड वगळता उर्वरित रस्त्यांवर पायी चालणाऱ्यांची व सायकलस्वारांची अवस्था अत्यंत असुरक्षित आहे. रस्ता ओलांडताना सुरक्षित वाटत नाही, जंक्शनजवळ अपघाताची भीती सतत वाटते. सायकलिंगसाठी कुठलीही व्यवस्था नाही आणि इंटरकनेक्टिव्हिटीचाही अभाव आहे. फुटपाथ अर्धवट, खंडित किंवा अतिक्रमित आहेत. सेंट्रल बाजार रोड (लोकमत चौक ते बजाजनगर चौक) व रिंग रोड या मार्गावर तर पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरूनच जावे लागते. फुटपाथ कुठे आहेत, तर तिथे दुकानदार व वाहनचालकांनी अतिक्रमण केलेले आहे. रिंग रोडवर सायकलस्वारांची संख्या अधिक असूनही त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. सर्वेक्षणात या सगळ्या अडचणी ठळकपणे नोंदवण्यात आल्या आहेत.
या रस्त्यांवर अपघाताचे धोके
स्पीड गन वापरून केलेल्या स्पीड सर्वेक्षणात बहुतेक रस्त्यांवर ताशी ६० किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांचा वेग आढळून आला. ऑरेंज सिटी रोड आणि अमरावती रोडवर दुचाकींचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत नोंदविण्यात आला. हा वेग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षित रस्त्यांच्या डिझाइन मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे. ज्यामुळे मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शहरांमध्ये आदर्श वेग मर्यादा सुमारे ३०-४० किलोमीटर प्रति तास असावी, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.
सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते करू
"या अभ्यासामुळे आपल्याला कुठे सुधारणा करावी लागेल हे स्पष्टपणे कळते. आम्ही या शिफारशी शहरपातळीवर लागू करून, सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते तयार करू."
- वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका