वेठबिगार बालमजूर प्रकरणात अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद; आलिशानच्या संचालकावर कारवाई नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 22:15 IST2026-02-07T22:14:49+5:302026-02-07T22:15:22+5:30
बिहारमधील अल्पवयीन मुलांना वेठबिगार म्हणून काम करवून घेण्याच्या संतापजनक प्रकरणात दोन दिवस होऊनही 'आलिशान'च्या संचालकांवर कसलीही कारवाई झाली नाही.

वेठबिगार बालमजूर प्रकरणात अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद; आलिशानच्या संचालकावर कारवाई नाही
नरेश डोंगरे
नागपूर : बिहारमधील अल्पवयीन मुलांना वेठबिगार म्हणून काम करवून घेण्याच्या संतापजनक प्रकरणात दोन दिवस होऊनही 'आलिशान'च्या संचालकांवर कसलीही कारवाई झाली नाही. कारवाईचा अधिकार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची या प्रकरणात संशयास्पद भूमिका दिसत असल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. ५) इतवारी (गांधीबाग) येथील नासिर क्रिएशन्समध्ये संयुक्तपणे छापा टाकला होता. छाप्यादरम्यान तेथे अनेक अल्पवयीन मुले काम करत असल्याचे दिसून आले होते. अशाच सहा बालकांना वेठबिगार ठेवण्यात आल्याची संतापजनक माहितीही पुढे आली होती. या मुलांना आवश्यक सोयी सुविधा न देता या बालमजुरांकडून रात्रं-दिवस काम करवून घेतले जात असल्याची माहिती उघड झाल्याने तहसील पोलिस ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदविण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणात नासिर क्रिएशन्सचा मालक मोहम्मद नासिर अन्सारी (वय २८, रा. निकालस मंदिर रोड, इतवारी) याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. शुक्रवारी बाल कल्याण समितीने पोलिसांना वेठबिगार तसेच मानवी तस्करीचा गुन्हा नोंदविण्याचेही आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी रात्री नासिर अन्सारीविरुद्ध नमूद गुन्ह्याचे कलम वाढविले. मात्र, ज्या ठिकाणी जाणाऱ्या मालासाठी हे बालमजूर राबत होते, त्याठिकाणच्या अर्थात आलिशानच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याने संतापयुक्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चाैकशीच्या नावाखाली टाईमपास करून नंतर हे प्रकरण थंडबस्त्यात टाकले जाण्याची चर्चा या संबंधाने सुरू झाली आहे.
'त्यांची' जबाबदारी नव्हती का?
ज्या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानासाठी माल तयार होत आहे, त्या ठिकाणी काम करणारे कारागिर आहेत की मजूर, येथे बालमजूर तर नाही ना, या मजुरांना आवश्यक सोयीसुविधा दिल्या जात आहे की नाही, किमान वेतन कायद्यानुसार त्यांना मोबदला मिळतो की नाही, ते तपासण्याची जबाबदारी आलिशानच्या मालकाचीही होती. त्याकडे त्यांनी लक्ष का दिले नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत. अर्थात, बालमजुरांना वेठबिगार म्हणून ठेवणाऱ्या नासिरच्या गुन्ह्यात आलिशानच्या मालकाचाही संबंध असावा, त्याचमुळे त्यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप होत असून आलिशानच्या संचालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
अधिकारी म्हणतात...
विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. कामगार विभागाचे अपर आयुक्त किशोर दहिफळकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आमच्याकडून आवश्यक ती चाैकशी आणि कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले, तर आमचाच या कारवाईत पुढाकार असल्याचा दावा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी केला. तहसीलचे ठाणेदार संजय मेंढे यांनी चाैकशी सुरू आहे, विधी अधिकाऱ्यांचे मत घेतले जाणार आहे, त्यानंतर कारवाई करू, असे सांगितले.