नकली टीसी, दलाल, बनावट तिकीटे आणि बोगस विक्रेत्यांचा सुळसुळाट
By नरेश डोंगरे | Updated: March 23, 2026 20:26 IST2026-03-23T20:20:07+5:302026-03-23T20:26:07+5:30
बोगसगिरीमुळे रेल्वे प्रशासनाच्या नाकी नऊ : वारंवार कारवाई; मात्र बनावटगिरीला चाप नाही

The proliferation of fake TCs, brokers, fake tickets and bogus sellers
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांमुळे रेल्वेची आधीच डोकेदुखी वाढलेली असताना आता बनावट तिकीटे, नकली टीसी,दलाल आणि बोगस विक्रेत्यांमुळे रेल्वे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. या प्रकारामुळे रेल्वेच्या महसुलावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशातील विविध भागात विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला वर्षभर ताप दिला जातो. त्यामुळे फुकट्यांना वठणीवर आणण्यासाठी अधून-मधून स्पेशल ड्राईव्ह केला जातो. चेकिंग स्टाफ विविध रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकावर उभा होऊन फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांना दंडाचा फटका देतात. तरीसुद्धा हा गैरप्रकार कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो.
आरक्षण तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक लुट करण्याचे प्रकार जुनेच आहे. हे दलालदेखिल सर्वत्र आढळतात. रेल्वेतील प्रवाशांच्या काही प्रवासी अलिकडे अॅपच्या माध्यमातून बनावट तिकिट तयार करून प्रवास करताना आढळतात. तर, कधी प्रयागराज, कधी इंदोर, भोपाळ तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नकली टीसी पकडले जातात.
अलीकडेच चिंचपोकळी येथे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका आरोपीला पकडले. धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती स्वतःला टीसी असल्याचे भासवून रेल्वेत फिरत होता. त्याच्याकडे टीसी असल्याचे भासवणारे बनावट ओळखपत्रही आढळून आले.
बोगस विक्रेत्यांचाही सुळसुळाट
रेल्वेत बोगस विक्रेत्यांचाही सुळसुळाट झाल्याचे नेहमीचेच चित्र आहे. रेल्वे प्रशासनाने अधिकृत स्कॅनर असलेले नोंदणीकृत विक्रेते नियुक्त केले असले, तरी जवळपास दररोजच विविध गाड्यांमध्ये बोगस विक्रेते पकडले जातात. हे विक्रेते आईसक्रीम, कोल्ड्रिंक तसेच इतर खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसतात.
विशेष म्हणजे, या विक्रेत्यांकडे बिसलरी, अॅक्वा यांसारख्या नामांकित ब्रँड्सची नक्कल केलेल्या पाण्याच्या बाटल्याही आढळून येतात. कंपनीचे नाव आणि लोगोची हुबेहूब नक्कल करण्यात येत असल्याने प्रवासी सहजपणे फसतात. अशा बनावट उत्पादनांमुळे प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो.
''असे गैरप्रकार होत आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्याला आळा घालण्याचे नियमित प्रयत्न सुरू आहेत. उन्हाळ्यात गर्दी वाढते. त्यामुळे या संबंधाने रेल्वेच्या रनिंग स्टाफला विशेष सूचना देण्यात आल्या असून स्पेशल ड्राईव्ह सुरू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सतर्कता बाळगून सहकार्य केल्यास असे गैरप्रकार रोखणे सहज शक्य आहेत.''
- अमन मित्तल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभाग