उन्हाळ्यात तांदळाचे भाव सामान्यांच्या बजेटबाहेर! जय श्रीराम, चिन्नोर तांदळाला सर्वाधिक मागणी

By मोरेश्वर मानापुरे | Published: May 13, 2024 09:05 PM2024-05-13T21:05:27+5:302024-05-13T21:06:06+5:30

ग्राहकांची मर्यादित खरेदी

The price of rice in the summer is beyond the budget of ordinary people! Jai Shriram, Chinnore rice is most in demand | उन्हाळ्यात तांदळाचे भाव सामान्यांच्या बजेटबाहेर! जय श्रीराम, चिन्नोर तांदळाला सर्वाधिक मागणी

उन्हाळ्यात तांदळाचे भाव सामान्यांच्या बजेटबाहेर! जय श्रीराम, चिन्नोर तांदळाला सर्वाधिक मागणी

मोरेश्वर मानापुरे, नागपूर: गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव लोकांच्या बजेटबाहेर गेले असून वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर त्यांचा भर दिसत आहे. कळमना न्यू धान्य बाजारात डिसेंबरच्या सुरुवातीला दर्जानुसार ५५ ते ६० रुपये असलेले चिन्नोरचे दर सध्या ७२ ते ७६ रुपयांवर पोहोचले. तर जयश्रीराम तांदूळ प्रति किलो ६ रुपयांनी वाढून ५८ ते ६२ रुपयांवर गेला आहे. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे.

नागपुरात ३५ टक्के चिन्नोर, ५० टक्के जयश्रीराम, बीपीटी, सुवर्णा आणि १० टक्के आंबेमोहोर व जयप्रकाश तांदळाची विक्री होते. त्यातच काली मूंछ वाणाचा तांदूळ खरेदी करणारेही बरेच आहेत. पण सर्वाधिक पसंती जुन्या चिन्नोरला आहे. या तांदळाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल १,८०० रुपयांनी वाढले आहेत. आंबेमोहर ६० ते ६४ रुपये आणि जयप्रकाश तांदूळ ८० ते ८२ रुपयांवर पोहोचला आहे. श्रीमंतांचा समजला जाणाऱ्या बासमती तांदळाचे दर दर्जानुसार प्रति किलो ७० ते १२० रुपयांदरम्यान आहे.

दरवाढीचा विक्रम मोडला

यंदा चिन्नोर तांदळाच्या भावाने काही वर्षांचा विक्रम मोडला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला कळमन्यात भाव ५५ ते ६० रुपयांदरम्यान होते. घाऊक बाजारात निवडणूका जाहीर झाल्यानंतर भाव अचानक वाढले. एप्रिल महिन्यात ६५ ते ६७ रुपये असलेले भाव मे महिन्यात ७३ ते ७६ रुपयांवर पोहोचले. याशिवाय अन्य तांदळाचेही भाव वाढले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत चिन्नोरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नागपूरकरांना आवडतो गावरानी चिन्नोर

नागपूरसह विदर्भात गावरानी चिन्नोर सर्वांच्या आवडीचा आहे. पॉलिस न केलेल्या चिन्नोरचे भाव जास्त आहेत. त्यानंतरही लोकांचा खरेदीकडे कल आहे. त्यापाठोपाठ जय श्रीराम तांदळाला मागणी आहे.

का वाढले दर?

हंगामाच्या सुरुवातीला तांदळाचे भाव आटोक्यात होते. तपत्या उन्हामुळे भाव वाढले. चिन्नोरमध्ये १,८०० रुपये तर इतर तांदळामध्ये प्रति क्विंटल ३०० ते ६०० रुपयांची वाढ झाली. जुन्या तांदळाला जास्त मागणी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमीच आहे.

दरवाढीची शक्यता

यावर्षी मार्चमध्येच ऊन वाढल्यामुळे तांदळातील ओलावा कमी झाला. त्यामुळे तांदळाचे दर वाढले. जुन्या तांदळालाही मागणी आहे. सामान्य आणि उच्च मध्यमवर्गीयांकडून जयश्रीराम, चिन्नोर, आंबेमोहोर, जयप्रकाश आणि गरीबांकडून बीपीटी आणि सुवर्णा तांदळाला मागणी आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात भाव वाढले आहेत.
रमेश उमाठे, धान्य व्यापारी, कळमना न्यू ग्रेन मार्केट.

तांदळाचे प्रकार व किंमत (घाऊक)

तांदूळ प्रति किलो भाव:

  • चिन्नोर ७३-७६
  • जय श्रीराम ५८-६२
  • आंबेमोहोर ६०-६४
  • जयप्रकाश ८०-८२
  • बीपीटी ४२-४४
  • सुवर्णा ३२-३५
  • बासमती ७०-१२०

Web Title: The price of rice in the summer is beyond the budget of ordinary people! Jai Shriram, Chinnore rice is most in demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर