'हा' कारनामा करणारे वायुदलात अभियंते जगात एकमेव ! रशियाचे मिग -२१ बनवले त्यांच्या कल्पनेपेक्षाही पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:30 IST2025-09-26T12:59:48+5:302025-09-26T14:30:09+5:30
अलविदा 'टायगर' : वायुदलाच्या अभियंत्यांची कमाल : विमानाचे आयुष्य २०-२२ वर्षांनी वाढविले

The only Air Force engineer in the world who has done this feat! Russia's MiG-21 has been made even further than their imagination
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रशियाने मिग-२१ हे लढाऊ विमान भारताला २४०० तास उड्डाण किंवा ४० वर्षे सेवा क्षमता असल्याचे सांगून विकले होते परंतु भारतीय वायुदलाच्या अभियंत्यांनी वेळोवेळी त्याची कार्यक्षमता वाढवत जवळपास ४००० तासांचे उड्डाण पूर्ण केले आणि विमानाचे आयुष्य तब्बल २०-२२ वर्षांनी वाढविले. हा कारनामा करणारे भारताचे वायुदल आणि त्याचे अभियंते हे जगात एकमेव आहेत, असे मत भारतीय वायुदलाचे माजी अधिकारी एअर मार्शल हरीश मसंद यांनी व्यक्त केले.
'लोकमत' शी संवाद साधताना मिग- २१ निरोपप्रसंगी, भारतीय इच्छाशक्ती असेल तर काय काही अशक्य नाही, याचे प्रत्यक्ष उदाहरण मिग-२१ असल्याची भावना एअर मार्शल मसंद यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले, जेव्हा हे विमान खरेदी केले तेव्हा त्यामध्ये काही कमतरता जाणवल्या. त्यात तोफ नव्हती, केवळ क्षेपणास्त्रावर अवलंबून होते. पण भारतीय वायुदलाच्या अभियंत्यांनी त्यात गोंडोला गन बसवून ही कमतरता भरून काढली. भारताने या विमानाचा ज्या प्रकारे वापर केला, तो मूळ रशियन संकल्पनेपेक्षा खूप पुढे होता.
एअर मार्शल म्हणून निवृत्त झालेले तेव्हाचे २८ स्क्वाड्रनचे सीओ विंग कमांडर विष्णोई यांनी मिग-२१ वापरून ढाकाच्या रनवेवर बॉम्बवर्षाव केला होता. हे काम हंटर किंवा सुखोई सारख्या विमानांचे होते. पुढे या मिगमध्ये कॅमेरे बसविण्यात आले.
कारगिल युद्धात मिग-२१ दिसले. अपग्रेडेड व्हर्जन बायसनसह ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्थमान यांनी जे करून दाखवले, ते सर्वश्रुत आहे. जगातील इतर देशाचे वायुदल लढाऊ विमानांचा वापर करतात, पण भारताने मिग-२१ चा अनेक प्रकारे उपयोग केला. या विमानाने ६२ वर्षे सेवा दिली. या काळात ४०० हून अधिक अपघात झाले म्हणजे दरवर्षी सुमारे ६-७अपघात. मात्र सामान्यतः वायुदलात दरवर्षी २०-२५ अपघात होतात, त्यापैकी अनेक प्रशिक्षण दरम्यानचे असतात. त्यामुळे मिग-२१ च्या अपघातांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत फारसे जास्त नव्हते.
आज वायुदलातून निरोप
रशियन बनावटीचे मिग-२१ लढाऊ विमान, जे अनेक दशकांपासून भारतीय वायुदलाची ताकद होते, ते शुक्रवारी (दि.२६) अधिकृतपणे सेवामुक्त केले जाणार आहे. चंदीगड वायुदल स्टेशनवर 'डी-कमिशनिंग' समारंभ आणि फ्लायपास्टद्वारे त्याला निरोप दिला जाईल.
मिग-२१, ज्याला 'पँथर्स' २ म्हणतात, त्याला निरोप दिला जाईल. समारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल अनिल चौहान, सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुदल प्रमुख ए. पी. सिंह आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहतील. मिग-२१ ने १९६५ व १९७१ चे युद्ध, १९९९ चे कारगिल युद्ध, तसेच २०१९ च्या बालाकोट हल्ल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.