'लोकमत'मधील बातमीमुळे सोनेगाव तलावाच्या बॅकवॉटरचा प्रश्न सुटणार
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: November 26, 2025 18:33 IST2025-11-26T18:32:54+5:302025-11-26T18:33:38+5:30
हायकोर्टाची दखल : स्वत: दाखल केली जनहित याचिका

The news in 'Lokmat' will solve the issue of Sonegaon Lake's backwaters
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनसामान्यांना न्याय देण्यासाठी कायम कटिबद्ध असलेल्या 'लोकमत'ने ठळकपणे बातमी प्रकाशित केल्यामुळे सोनेगाव तलावाच्या बॅकवॉटरचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने संबंधित बातमीची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात सोनेगाव तलाव तुडुंब भरला होता. त्याचा सर्वांना आनंदही झाला होता. परंतु, तलावाच्या बॅकवॉटरने प्रसाद गृहनिर्माण सोसायटी, ममता सोसायटी व पॅराडाईज सोसायटीतील शेकडो रहिवाशांचे जगणे कठीण केले. त्यांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्यासह विविध गृहउपयोगी साहित्य खराब झाले. घरातील पाणी बाहेर काढता-काढता रहिवाशांच्या नाकीनऊ आले. रोडवर गुडघाभर पाणी तुंबले होते. परिणामी, रहिवाशांना घराबाहेर पडणे अडचणीचे ठरत होते. करिता, अनेकांनी नातेवाईकांच्या घरात आश्रय घेतला होता. ही परिस्थिती केवळ यावर्षीची नसून हे रहिवासी गेल्या १५ वर्षांपासून या समस्येला तोंड देत आहेत. त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे 'लोकमत'ने २१ सप्टेंबर २०२५ रोजी बातमी प्रकाशित करून ही समस्या प्रकाशात आणली होती.
ॲड. संदीप मराठे न्यायालय मित्र
या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. संदीप मराठे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. तसेच, त्यांना चार आठवड्यात नियमानुसार याचिका तयार करण्यास सांगितले. नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने ॲड. गिरीश कुंटे यांनी न्यायालयाची नोटीस स्वीकारली.
रात्रभर घरातील पाणी काढावे लागले
ममता सोसायटीतील दामले यांच्या घरातील कपडे, सोफा, दिवाण, लाकडी फर्निचर ओले झाले. ड्रॉईंग रुमपासून स्वयंपाक घरापर्यंत पाणीच पाणी होते. दामले कुटुंबियांना घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.
विषारी साप व जीवजंतूंचा धोका
तलावाचे बॅकवॉटर तुंबल्यानंतर परिसरातील विषारी साप व जीवजंतू बाहेर पडतात. ते घरात शिरतात. त्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. गटारातील घाण बाहेर येऊन परिसरात दूर्गंधी पसरते. त्याने रहिवाशांचे आरोग्य खराब होते.