स्फोटकांच्या संशयाने दक्षिण एक्सप्रेसमधील प्रवाशांचा जीव दहशतीत
By नरेश डोंगरे | Updated: December 9, 2024 23:33 IST2024-12-09T23:33:04+5:302024-12-09T23:33:28+5:30
तब्बल तीन तास जीव मुठीत घेऊन प्रवास : नागपूर स्थानकावर अख्खा कोच झाला खाली

स्फोटकांच्या संशयाने दक्षिण एक्सप्रेसमधील प्रवाशांचा जीव दहशतीत
- नरेश डोंगरे
नागपूर : दक्षिण एक्सप्रेसच्या कोचमध्ये पडून असलेल्या बेवारस बॅगमध्ये स्फोटके असल्याची शंका निर्माण झाल्याने प्रवाशांना प्रचंड दहशतीत आमला ते नागपूरपर्यंत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. हजरत निजामुद्दीन दिल्ली स्थानकावरून हैदराबादकडे निघालेल्या ट्रेन नंबर १२७२२ दक्षिण एक्सप्रेसच्या थर्ड एसी कोच (१९२८८०)च्या बर्थ नंबर ६६ खाली बऱ्याच वेळेपासून एक बेवारस बॅग पडून होती. त्यात स्फोटके असावी, असा संशय आल्याने कोचमधील प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली.
दरम्यान, आमला रेल्वे स्थानकावरून गाडी नागपूरकडे निघाल्यानंतर एका प्रवाशाने या बॅगमध्ये स्फोटके असल्याचा संशय व्यक्त करणारी तक्रार रेल्वे कंट्रोलला केली. त्यामुळे नागपूर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल अलर्ट मोडवर आले. त्यांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), डॉग स्कॉड सज्ज केले. ईकडे धडधडत नागपूरकडे येणाऱ्या या गाडीच्या कोचमधील प्रवाशांचा जीव स्फोटकांच्या शंकेमुळे अक्षरश: टांगणीला लागला होता.
अनेकांनी त्या बॅगजवळ असलेल्या आपल्या सीटस् सोडून दोन्ही टोकांच्या दाराजवळ उभे राहून प्रवास करणे पसंत केले. गाडी सायंकाळी ५ च्या सुमारास नागपुरात येताच. प्रवाशांनी फलाटावर अक्षरश: उड्या घेत कोच रिकामा केला. दरम्यान, रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीआरपीचे एपीआय गौरव गावंडे यांनी बीडीडीएसच्या माध्यमातून ही बॅग खाली काढली.
प्रवाशांची गर्दी बाजुला हटवून श्वानाच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. बॅगमध्ये स्फोटके अथवा तसे काहीच आक्षेपार्ह्य नसल्याचे संकेत श्वानाने दिले. त्यामुळे बॅग उघडून तपासली असता त्यात केवळ कपडे आणि कागदपत्रे आढळली. ते कळताच अडीच-तीन तासांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
संपूर्ण गाडीची तपासणी
खबरदारीचा उपाय म्हणून जीआरपी, आरपीएफने संपूर्ण गाडीची कसून तपासणी केली. गाडीत काहीही आक्षेपार्ह्य नसल्याची खात्री पटल्यानंतर अर्धा तास विलंबाने ही गाडी हैदराबादकडे रवाना करण्यात आली.
भोपाळच्या प्रवाशाच्या चुकीमुळे दहशत
बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे जीआरपीने चाैकशी केली असता ती भोपाळमधील एका प्रवाशाची असल्याचे स्पष्ट झाले. तो गाडीतून घाईगडबडीत उतरल्याने ही बॅग सोबत घेण्याचे विसरला आणि नंतर यामुळे अनेक प्रवाशांना दहशतीत प्रवास करावा लागला.