विदर्भाची भूमी ही भाषेच्या संगमाची भूमी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By आनंद डेकाटे | Updated: November 23, 2025 17:38 IST2025-11-23T17:37:18+5:302025-11-23T17:38:38+5:30
‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भाची भूमी ही भाषेच्या संगमाची भूमी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :नागपूर हे समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. देशाला दिशा देणारे आणि देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेले हे सांस्कृतिक शहर आहे. विदर्भाची भूमी ही भाषेच्या संगमाची भूमी आहे. मराठी आणि हिंदी साहित्य निर्मितीची समांतर समृद्ध परंपरा येथे पहायला मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडियाच्या वतीने व महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर बुक फेस्टिव्हल २०२५ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. २३ आणि २४ तसेच २९ आणि ३० नोव्हेंबरदरम्यान हा साहित्य महोत्सव रेशीमबाग मैदानावर होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्ध्याच्या कुलगुरू व साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा डॉ. कुमुद शर्मा, लेखक व शिवकथाकार विजयराव देशमुख, झिरो माईल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक सत्यनारायण नुवाल, अध्यक्ष अजय संचेती, संचालक समय बनसोड उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथे गोंड राजांनी सार्वजनिक ग्रंथालयाची परंपरा सुरू करून ज्ञानसंस्कृती रुजवली. भोसले काळात हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात नागपूरने मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य हे अभिजात आहे. नागपूर विदर्भातील अनेक साहित्यिकांनी या संस्कृतीला समृद्ध करण्याचे काम केले आहे. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून वैचारिक कक्षा रुंदावून प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे यांनी केले. संचालन वेदिका मिश्रा यांनी केले तर युवराज मलिक यांनी आभार मानले.
वाचन संस्कृती जोपासण्याची गरज : राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, आजच्या काळात वाचनाची गरज सर्वाधिक आहे. डिजिटल माध्यमामुळे वाचनाला धोका निर्माण होत असल्याने या पुस्तक महोत्सवाचे महत्त्व अधिक आहे. वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. या महोत्सवात ३०० हून अधिक प्रकाशक आणि १५ लाखांहून अधिक पुस्तके उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.