क्रूरतेचा कळस! मासिक पाळीत खोलीत कोंडायचे अन् सोन्याच्या गोफसाठी मारायचे
By योगेश पांडे | Updated: March 7, 2025 00:14 IST2025-03-07T00:14:12+5:302025-03-07T00:14:29+5:30
सासू, पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या : लग्नाच्या १४ महिन्यांतच दिला जीव

क्रूरतेचा कळस! मासिक पाळीत खोलीत कोंडायचे अन् सोन्याच्या गोफसाठी मारायचे
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : माहेरच्या मंडळींनी लग्नात हुंडा दिला नाही या कारणावरून बुरसटलेल्या विचारसरणीच्या आई-लेकाने विवाहितेचा अन्वयित छळ केला व त्याला कंटाळून तिने अखेर गळफास घेत जीव दिला. सासरच्या लोकांनी क्रुरतेचा कळस गाठला होता. मासिक पाळीच्या दिवसांत तिला चक्क खोलीत कोंडून बाहेर जाण्यास मनाई करायचे. छळ असहनीय झाल्यामुळे लग्नाच्या १४ महिन्यांतच विवाहितेने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. महिला दिनाच्या आठवड्यातच गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, समाजातील अनिष्ट चालीरीतींची कीड अद्यापही खोलवर रुजल्याची बाब यातून समोर आली आहे.
प्रियंका लांजेवार-ढोबळे (२८, गणेशपेठ) असे मृत विवाहितेचे नाव आहे, तर शैलेश गुलाबराव ढोबळे (३८, गणेशपेठ) व रेवती गुलाबराव ढोबळे (७०) अशी आरोपींची नावे आहेत. तिची आई संध्या लांजेवार यांच्या तक्रारीनुसार प्रियंका व शैलेशचे जानेवारी २०२४ मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांतच शैलेशने प्रियंकाला त्रास देण्यास सुरुवात केली. तुझ्या आईने लग्नाचा पूर्ण खर्च केला नाही व मला फक्त साडेआठ ग्रॅमची अंगठी दिली. मला गोफ का दिला नाही, अशी विचारणा करत तो तिचा छळ करायचा. मासिक पाळीच्या वेळेस आरोपी तिला खोलीत बंद करायचे. ते तिला घराबाहेर जाऊ देत नव्हते. वस्तीत फारसे कुणाशी बोलू देत नव्हते. दरम्यान, हुंड्याच्या कारणावरून शैलेशने तिचा गळा दाबून जीव घेण्याचादेखील प्रयत्न केला होता. तिची सासू व शैलेश प्रत्येक सणाला तिला टोमणे मारून मानसिक छळ करायचे. त्यामुळे अडीच महिने प्रियंका माहेरीच होती. डिसेंबर महिन्यात शैलेश आपण चांगल्याने राहू असे म्हणत घरी घेऊन गेला. तिच्या नातेवाइकांनी कपड्यांसाठी दिलेले पैसे त्याने दारूत उडविले. दिवसेंदिवस छळ वाढतच चालला होता. अखेर दि. ३ मार्च रोजी प्रियंकाने रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास खोलीचा दरवाजा लावला व ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. शैलेशने तिच्या लखनौ येथे राहणाऱ्या बहिणीला फोनवरून या प्रकाराची माहिती दिली. संध्या लांजेवार यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. शैलेश व सासू रेवतीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीव्ही व बेड बदलला तरी छळवणूक
संध्या यांनी प्रियंकाच्या लग्नात शैलेशला टीव्ही व बेडदेखील दिला होता. मात्र तो पसंत नसल्यानेदेखील तो प्रियंकाला छळत होता. संध्या यांनी टीव्ही व बेड बदलवून दिला. मात्र तरीदेखील वागणुकीत फरक पडला नव्हता.
आत्महत्येच्या दिवशीदेखील मारले टोमणे
आत्महत्येच्या सात दिवस अगोदर एका नातेवाईकाच्या घरी पोहोचण्यास उशीर झाल्याने शैलेशने प्रियंकाला व तिला सोडणाऱ्या ऑटोचालकाला शिवीगाळ केली होती. आत्महत्येच्या दिवशी दुपारी प्रियंकाने ही बाब आईला सांगितली. त्यावेळी सासू रेवतीने टोमणे मारले. तुझ्या आईला मानपान समजत नाही का व तिने असेच संस्कार दिले का असे सासू बोलत असताना अखेर प्रियंकाने फोन कट केला होता.