लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :विदर्भातील जनतेच्या आरोग्याशी थेट संबंध असणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नागपूर प्रयोगशाळेतील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह बनत चालली आहे. सध्या संपूर्ण विदर्भातून औषध व अन्नाचे नमुने फक्त नागपूरच्या या एकमेव प्रयोगशाळेत येतात, मात्र इथे ना आवश्यक उपकरणे आहेत, ना कर्मचारी. लोकांच्या आरोग्य सुरक्षेचा खेळखंडोबा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
नुकत्याच समोर आलेल्या विषारी कफ सिरप प्रकरणामुळे 'एफडीए' नॉन-बॅण्डेड सिरपचे नमुने तपासणी घेऊ लागले असले तरी नागपूरच्या लॅबमध्ये 'गॅस क्रोमॅटोग्राफी' सारखे मूलभूत उपकरणच नाही. त्यामुळे या नमुन्यांची तपासणी करता येत नसून, त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या लॅबमध्ये पाठवावे लागत आहे. परिणामी, अहवाल तयार होण्यासाठी सुमारे १५ दिवसांवर वेळ लागतो आहे.
२८ पदे रिक्त, कामाचा डोंगर, आरोग्याचा खेळ !
नागपूर लॅबमध्ये मंजूर ४१ पदांपैकी केवळ १३ पदेच भरलेली आहेत, उर्वरित २८ पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या विदर्भासाठी ही लॅब एकटीच जबाबदारी सांभाळते आहे; पण तीही अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अपंग स्थितीत आहे.
औषधांचे ५५ वर, अन्नाचे २५०० नमुने
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लॅबमध्ये औषधांचे ५५ ते ६० नमुने तपासणीसाठी आहे, तर दिवाळीच्या तोंडावर अन्नामध्ये भेसळीचे प्रमाण मोठे असले तरी या प्रयोशाळेकडे २५०० हून अधिक अन्न नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहे. नमुन्यांमध्ये काही चूक आढळल्यास दुहेरी तपासणी करावी लागते. यामुळे आणखीच वेळ लांबतो आणि नागरिकांच्या जिवाशी थट्टा होते.
काय आहे आरोग्य विभागाचे धोरण ?
औषधी क्षेत्रातील तज्ज्ञानुसार, विदर्भातील कोट्यवधी जनतेच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणावर असा प्रश्न आहे, प्रयोगशाळेकडे यंत्र नाहीत, मनुष्यबळ नाही आणि आत्ता प्रकरण गंभीर असूनही कुणी दखल घेत नाही. विषारी औषधांमुळे जीवितहानी झाली, तर त्याचा दोष कोण स्वीकारणार, तपासणीला उशीर झाल्याने दोषी औषधे किंवा अन्न बाजारातच राहतात आणि नागरिक अनवधानाने त्याचा वापर करतात.
तातडीने उपाययोजना गरजेची
- नागपूर लॅबमध्ये गॅस क्रोमॅटोग्राफी यंत्र तातडीने उपलब्ध करून देणे
- रिक्त पदे तातडीने भरून मनुष्यबळ वाढवणे
- नागपूर विभागासाठी अद्ययावत प्रयोगशाळा तातडीने उभारणे
- अमरावती विभागासाठी नवीन प्रयोगशाळा उभारणे
- अशा मूलभूत सुविधा जर उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर विदर्भातील जनता आरोग्याच्या बाबतीत कायमच धोका पत्करत राहणार!
Web Summary : Vidarbha's FDA lab faces critical shortages of equipment and staff, crippling drug and food sample testing. Vital equipment like gas chromatography is missing, delaying reports. With numerous vacancies, the lab struggles to handle the workload, jeopardizing public health and safety amid rising adulteration concerns.
Web Summary : विदर्भ की एफडीए प्रयोगशाला उपकरण और कर्मचारियों की गंभीर कमी का सामना कर रही है, जिससे दवा और खाद्य नमूना परीक्षण बाधित हो रहा है। गैस क्रोमैटोग्राफी जैसे महत्वपूर्ण उपकरण गायब हैं, जिससे रिपोर्ट में देरी हो रही है। कई रिक्तियों के साथ, प्रयोगशाला कार्यभार संभालने के लिए संघर्ष कर रही है, जिससे बढ़ते मिलावट संबंधी चिंताओं के बीच सार्वजनिक स्वास्थ्य और सुरक्षा खतरे में है।