अधिवेशनातील आजच्या चर्चेकडे शेतकऱ्यांचे डोळे; पदरी काय पडणार, याकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 09:00 IST2023-12-11T08:57:56+5:302023-12-11T09:00:48+5:30
सरकारच्या लहरी धाेरणांचा संत्री, कांदा उत्पादतकांना बसलेला फटका अन् त्यात अवकाळीचा फेरा यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा सोमवारी हिवाळी अधिवेशनात हाेणाऱ्या चर्चेकडे लागल्या आहेत.

अधिवेशनातील आजच्या चर्चेकडे शेतकऱ्यांचे डोळे; पदरी काय पडणार, याकडे लक्ष
राजेश शेगाेकार
नागपूर : सरकारच्या लहरी धाेरणांचा संत्री, कांदा उत्पादतकांना बसलेला फटका अन् त्यात अवकाळीचा फेरा यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा सोमवारी हिवाळी अधिवेशनात हाेणाऱ्या चर्चेकडे लागल्या आहेत. पहिले दाेन दिवस शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरल्याने अखेर सरकारने चर्चेची तयारी दर्शविली आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अंदाजे ४ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, तब्बल २२ जिल्ह्यांना फटका बसला. यवतमाळ, हिंगाेली, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले.
आज स्थगन प्रस्तावावर चर्चा
शेतकऱ्यांच्या नुकसानीवरच सोमवारी विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आक्रमक होत स्थगन प्रस्ताव दाखल करून चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी हा स्थगन फेटाळला होता.
संत्र्याचे आयात शुल्क वाढविले
बांगलादेशने २०१९ मध्ये संत्र्यांवर प्रति किलाे २० रुपये आयात शुल्क लावले. हे शुल्क यावर्षी ८८ रुपये प्रति किलाे करण्यात आले. त्यामुळे संत्र्यांची निर्यात ६० टक्क्यांनी घटली आहे.
कांदा अडचणीत
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार ऑगस्ट २०२३ पासून प्रयत्न करीत आहे. कांद्याची निर्यात थांबविण्यासाठी आधी कांद्याचे निर्यात मूल्य वाढविले. त्यामुळे कांदा निर्यातदार अडचणीत आले.
काँग्रेसचा आज ‘हल्लाबोल’
नागपूर : काँग्रेसतर्फे महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी जाब विचारण्यासाठी ‘हल्लाबोल’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ डिसेंबरला विधानभवनावर हा मोर्चा धडकणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.