परीक्षा दिली होती 'बीबीए'ची गुणपत्रिका 'बी.कॉम.'ची ! नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:39 IST2025-08-21T19:37:53+5:302025-08-21T19:39:10+5:30

उपस्थित विद्यार्थ्यांना 'गैरहजर' दाखवत केले नापास : विद्यार्थ्यांचा परीक्षा नियंत्रकास घेराव

The exam was given for 'BBA' but the mark sheet was for 'B.Com'! Nagpur University's mismanagement | परीक्षा दिली होती 'बीबीए'ची गुणपत्रिका 'बी.कॉम.'ची ! नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार

The exam was given for 'BBA' but the mark sheet was for 'B.Com'! Nagpur University's mismanagement

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वेगवेगळ्या परीक्षांमधील अनियमिततेमुळे वादात राहणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात बुधवारी नवाच गोंधळ दिसून आला. बीबीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बीकॉम अभ्यासक्रम नमूद करण्यात आला आहे. याशिवाय, प्रत्यक्षात परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत 'गैरहजर' दाखवून नापास करण्यात आल्याचे समोर आले आहे. 


गुणपत्रिका मिळाल्यानंतर असा प्रकार दिसून आल्याने गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वात परीक्षा विभागाचे अधिकारी मनीष झोडपे यांचा घेराव घातला. या प्रकारामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाल्याची संतप्त भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठाच्या निष्काळजी कारभारामुळे त्यांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप वसीम खान यांनी केला. आम्ही परीक्षेला बसलो, तरीही गुणपत्रिकेत गैरहजर दाखवून नापास केले गेले. एवढ्या मोठ्या विद्यापीठात असा गोंधळ कसा होऊ शकतो, असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. हा प्रकार केवळ टायपिंग किंवा संगणकीय चूक नसून, परीक्षा विभागातील एकूणच बेफिकीर व निष्काळजी कारभाराचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाने यात तातडीने सुधारणा करून योग्य गुणपत्रिका द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. 


दरम्यान, परीक्षा विभागाचे मनीष झोडपे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत कुठलीही चूक नसल्याचा दावा केला आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार बीबीए, बीसीए व बीकॉम हे तिन्ही अभ्यासक्रम एकाच नावाने ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे तिन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'बीकॉम' हेच नमूद राहणार आहे. गैरहजर दर्शविण्याचा विषयही त्यांनी स्पष्ट केला. एनईपीनुसार 'मेजर', 'मायनर' व इतर प्रकारचे विषय अभ्यासक्रमात असतात. संबंधित विद्यार्थ्यांचा मायनर विषयात बदल झाल्याची शक्यता असल्याने 'गैरहजर' दर्शविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संभ्रमामुळे हा गोंधळ होत आहे. 


संभ्रम कुणामुळे ?

  • परीक्षा विभागाचे अधिकारी विद्यार्थी संभ्रमित असल्याचे सांगतात, पण हा संभ्रम कुणामुळे निर्माण झाला, हा सवाल आहे.
  • महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी एनईपीबाबत योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले नाही, असे विद्यापीठाचे अधिकारी आरोप करतात.
  • मात्र, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात एनईपी लागू करून दोन वर्षे झाली असताना विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: The exam was given for 'BBA' but the mark sheet was for 'B.Com'! Nagpur University's mismanagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.