दुचाकीच्या आगीत चालकही होरपळला, ५५ टक्के जळाल्याने आयसीयूत भरती
By सुमेध वाघमार | Updated: November 3, 2023 18:20 IST2023-11-03T18:18:44+5:302023-11-03T18:20:46+5:30
मेडिकलमधील घटना

दुचाकीच्या आगीत चालकही होरपळला, ५५ टक्के जळाल्याने आयसीयूत भरती
नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात अचानक दुचाकीने पेट घेतल्याने चालकही होरपळून जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास घडली. जखमी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मनीष समुद्रे (४२) जळालेल्या कर्मचाऱ्याचे नाव. मेडिकलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून ते कामाला आहेत. ते मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात राहतात. प्राप्त माहितीनुसार, समुद्रे हे मागील दोन दिवसांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. ते शुक्रवारी सकाळी ११.३० ते १२ वाजताच्या दरम्यान टीबी वॉर्ड परिसरातील त्वचारोग विभागाच्या मागील भागात ऑक्सीजन प्लांटजवळ आले असताना अचानक त्यांचा ‘प्लॅटीना’ नावाच्या दुचाकीने पेट घेतला. यात समुद्रे ५५ टक्के भाजले.
आजूबाजूचे लोक धावून आल्यावर त्यांना तातडीने मेडिकलमध्ये दाखल केले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ‘आयसीय’मध्ये स्थानांतरीत केले. या घटनेची चौकशी अजनी पोलीस करीत आहे. असेही सांगण्यात येते की, समुद्रे मागील काही दिवसांपासून तणावात होते. कोणाशी नीट बोलत नव्हते. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न तर केला नसावा, याची चौकशीही पोलीस करीत आहेत.