संबंधाला वधूची सहमती होती म्हणून नवीन कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:21 IST2025-02-27T12:20:26+5:302025-02-27T12:21:27+5:30
हायकोर्टाचा निर्णय : वर मुलाला दिलासा

The crime of rape was abolished under the new law as the bride consented to the relationship
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्न पक्के झाल्यानंतर वाग्दत्त वधूने वर मुलासोबत सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचे पुरावे आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्कारासह इतर गुन्ह्यांचा एफआयआर आणि खटला रद्द केला. न्यायमूर्तिद्वय नितीन सूर्यवंशी व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला.
मुलगा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे अमरावती जिल्ह्यातील मुलीसोबत लग्न ठरले होते. २८ मे २०२३ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. ते २६ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न करणार होते. दरम्यान, पत्रिका वाटत असताना मुलाचा गंभीर अपघात झाला. त्यानंतर त्यांचे लग्न रद्द करण्यात आले.
परिणामी, वाग्दत्त वधूने बलात्काराची तक्रार नोंदविली होती. मुलाचा लग्न करण्याचा विचार नव्हता. त्यामुळे साखरपुडा झाल्यानंतर त्याने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप मुलीने केला होता. त्यावरून अमरावतीमधील गाडगेनगर पोलिसांनी वर मुलासह त्याचा मोठा भाऊ व वहिनीविरुद्ध वादग्रस्त एफआयआर नोंदविला व तपास पूर्ण करून प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यामुळे तिन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तक्रारीमागे छुपा हेतू होता
संबंधित लग्न ६ एप्रिल २०२४ रोजी रद्द झाले. परंतु, मुलीने २९ मे २०२४ रोजी बलात्काराची तक्रार केली. ही कृती दीर्घ विचारांती घडली. त्यामागे मुलीचा छुपा हेतू, वैयक्तिक द्वेश व सुडाची भावना असावी, असे आढळून येते, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. आरोपींच्या वतीने अॅड. विश्वेश नायक व अॅड. राजेश नायक यांनी बाजू मांडली.