'मी जी मोठी चूक केली, आता ती बावनकुळेंनी करू नये'; नितीन गडकरींचा राजकीय सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 09:33 IST2025-04-07T09:27:37+5:302025-04-07T09:33:28+5:30

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीच्या मुद्द्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना एक राजकीय सल्ला दिला. 

'The big mistake I had made, Chandrashekhar Bawankule should not make it now'; Nitin Gadkari's political advice | 'मी जी मोठी चूक केली, आता ती बावनकुळेंनी करू नये'; नितीन गडकरींचा राजकीय सल्ला

'मी जी मोठी चूक केली, आता ती बावनकुळेंनी करू नये'; नितीन गडकरींचा राजकीय सल्ला

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. जात, धर्माबद्दलही ते सातत्याने त्यांची मते मांडत असतात. रविवारी एका कार्यक्रमात राजकीय पक्षांमधील प्रत्येक जातीच्या सेलवरून नितीन गडकरींनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना सल्ला दिला. स्वतःच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत गडकरी म्हणाले की, 'मी केलेली चूक बावनकुळेंनी करू नये.'

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
भाजपच्या ४४ व्या स्थापनादिनी आयोजित कार्यक्रमादरम्यान रविवारी ते नागपुरात बोलत होते. गडकरी म्हणाले, 'भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना अनेक वरिष्ठांचा सल्ला न मानता मी विविध जातींचे सेल उघडले होते. सर्व जातींना पक्षासोबत जोडणे हेच त्यामागील उद्देश होता. मात्र, जाती जुळल्याच नाहीत व ती मोठी चूकच ठरली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती चूक करू नये', असा सल्ला गडकरींनी बावनकुळेंना दिला. 

वाचा >>शिवसेनेच्या फुटीत तुमची भूमिका होती का? नितीन गडकरींनी काय दिले उत्तर?

'आता मनपा निवडणुकीदरम्यान विविध जातींच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पत्रे येतील, तेव्हा बावनकुळेंना माझ्या बोलण्याची गंभीरता लक्षात येईल. भाजप हीच आपली जात आहे, हे सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे', असा अशी भूमिका नितीन गडकरी यांनी यावेळी मांडली.  

काँग्रेसने भाजपबद्दल अपप्रचार केला

'भाजप हा जातीयवादी पक्ष नाही. मात्र, काँग्रेसने समाजाची दिशाभूल करून जनमानसात तसा अपप्रचार केला होता. भाजपला अनेक संघर्षातून जावे लागले व त्यातून तावून सुलाखून पक्ष समोर आला. आज जगातील सर्वांत
मोठा राजकीय पक्ष आहे', अशी टीका गडकरींनी काँग्रेसवर केली. 

तितकेच प्रेम कार्यकर्त्यांवरही करा -गडकरी

'मुळात पक्ष हा परिवार आहे व नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांना तशीच वागणूक दिली पाहिजे. नेत्यांचे त्यांच्या मुलांवर प्रेम आहेच व अनेक जण तिकिटासाठी आग्रहदेखील करतात. मात्र, तेवढेच प्रेम कार्यकर्त्यांवरदेखील केले पाहिजे', असे खडेबोल गडकरींनी पक्षातील नेत्यांना सुनावले.

कम्युनिस्ट पक्षाची जागा घेतली विकत

कम्युनिस्ट पक्ष व हिंदू महासभेचे कार्यालय या जागेवर होते व ते विकत घेतले. अनेक भाडेकरूंना येथून रिकामे करून आता कार्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी कार्यालयामागील भाव लक्षात घेतला पाहिजे, असा किस्सा गडकरींनी यावेळी सांगितला. 

Web Title: 'The big mistake I had made, Chandrashekhar Bawankule should not make it now'; Nitin Gadkari's political advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.